Beed school news कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या विरोधात शिक्षण बचाव नागरी समितीचे निदर्शने
बीड,
Beed school news वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास बीड मधे विरोध करण्यात आला असून हा निर्णय रद्द करावा म्हणून शिक्षण बचाव नागरी समिती जिल्हा बीडने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
राज्यातील वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीड येथे पुरोगामी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या जनविरोधी धोरणास विरोध करण्यासाठी शिक्षण बचाव नागरी समिती जिल्हा बीडची स्थापना केली.
या समिती तर्फे आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी महोदया मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की देशात महाराष्ट्राची पुरोगामी राज्य म्हणून ओळख आहे. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी सामान्य माणसाला शिक्षण प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले आहे.
त्यांचा तो वारसा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, डॉ. बापूजी साळुंखे ते समाजसुधारक बलभीमराव कदम यांच्या सारख्या शिक्षण महर्षींनी पुढे नेला. त्यांनी वाड्या वस्त्यावर शिक्षण पोहंचवले. विद्यमान राज्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या या महान शैक्षणिक परंपरेचा अपमान आहे.
उठसूट राज्यकर्ते फुले,शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतात मात्र त्यांची ही कृती या महामानवांच्या विचारांचा खून करणारी आहे. या निर्णयामुळे सुमारे तेरा हजार पाचशे शाळा बंद होणार असून सुमारे अडीच लाखांपेक्ष जास्त विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाणार आहेत.
बीड जिल्ह्यात अशा सहाशे तेहतीस शाळांची यादी प्रशासनाने घोषित केली आहे. लहान वस्ती, वाड्या, तांड्यावरील या शाळा आहेत.
गोरगरीब, दलित शोषित श्रमिक-कष्टकरी वर्गाला शिक्षणाची दारे बंद करणारा हा निर्णय ताबडतोब रद्द करावा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा शिक्षण बचाव नागरी समिती जिल्हा बीडचे निमंत्रक राजकुमार कदम, संघटक डॉ. गणेश ढवळे, काॅम्रेड नामदेव चव्हाण, उत्तमराव सानप, डी.जी.तांदळे, जे.एम.पैठणे, सुनिल क्षीरसागर, डाॅ. सतीश साळुंके, बबन वडमारे, दत्ता बारगजे, मुज्तफा खान, कालिदास धपाटे, जोतिराम हुरकुडे, भाऊराव प्रभाळे, मोहन जाधव, रोहिदास जाधव, मनोज जाधव, रामहरी मोरे, नितीन रांजवण, संजय इंगोले, सुहास जायभाये यांनी दिला आहे.