जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आज (18 एप्रिल) मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने कोरोना आढावा बैठकीत थेट राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरच संताप व्यक्त केला. यानंतर संतापलेल्या बाळासाहेब थोरात यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला चांगलंच सुनावलं. तुझं जितकं वय आहे, तितकं माझं राजकारण असल्याचं सांगत थोरात यांनी त्याला कुणाशी बोलतो हे समजून बोल, असा इशाराही दिला. त्यामुळे काही काळ या बैठकीत गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं
अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचा आरोप करत या कार्यकर्त्याने बाळासाहेब थोरात यांच्यावर संताप व्यक्त केला. यावेळी त्याने अकोल्याला रेमडेसिवीर का मिळत नाही? असा सवाल उपस्थित केला. तसेच अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांन्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका म्हणत हा कार्यकर्ता बाळासाहेब थोरात यांच्यावरच डाफरला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याला चांगलंच सुनावलं.
“तुझं जितकं वय तितका माझं राजकारण आहे”
बाळासाहेब थोरात म्हणआले, “तुझं जितकं वय आहे तितकं माझं राजकारण आहे. तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाहीयेत का? आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं असं नाही.”
.. अन राष्ट्रवादीचे आमदार लहामटे यांनी कार्यकर्त्यासमोर हात जोडले
दरम्यान, रविंद्र मालुंजकर अध्यक्ष राष्ट्रवादीच्यातालुका युवा कॉंग्रेसयांनी उभे राहून राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्यावर संताप व्यक्त केला. यावर आमदार किरण लहामटे यांनी कार्यकर्त्यापुढे थेट हात जोडल्याचं पाहायला मिळालं.
‘मी काय चुकीचं बोलतो आहे’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा सवाल
रविंद्र मालुंजकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आरडाओरडा सुरु केल्यानंतर बैठकीला उपस्थित लोकांनी त्याला शांत बसण्यास सांगितले. मात्र, मी काय चुकीचं बोलतो आहे असा प्रतिसवाल करत त्याने आपलं बोलणं सुरुच ठेवलं. अकोले तालुक्याला रेमडेसिवीर इंजेक्शन कमी का? असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता.
या गोंधळानंतर स्वतः आमदार किरण लहामटे यांनी या आक्रमक कार्यकर्त्याला खाली बसण्यास सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर या ठिकाणी उपस्थित इतर नागरिकांनी आम्हीही येथे समस्या मांडायला आलोय, आम्हाला आमचे प्रश्न मांडू द्या गोंधळ करु नका, असं मत व्यक्त केलं. मात्र, बैठकीतील गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर या कार्यकर्त्याला तेथून बाहेर काढून देण्यात आलं.