अहमदनगर ,
Animal Husbandry Fortnight organized from 1st August to 15th August सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबविते. राज्य शासनाने महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नव्याने महत्वाकांक्षी अशा योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा. योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात महसुल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित केला आहे. महसुल पंधरवड्यातुन महसुली सेवांचा सर्वसामान्यांना लाभ देण्यात यावा तर पशुसंवर्धन पंधरवड्यातुन पशुधनास आरोग्याच्या सेवा मोफत पुरविण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.
बैठकीस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्र.जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, यापूर्वी राज्यामध्ये महसुल सप्ताह राबविण्यात येत होता. सर्वसामान्यांना महसुल विभागाशी निगडीत सेवा अधिक प्रमाणात मिळाव्यात यासाठी यावर्षी महसुल पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महसुल पंधरवड्यामध्ये शासनाच्या विविध योजनांबरोबरच महसुल विभागाशी निगडीत असलेल्या सेवांचा लाभ देण्यात यावा. त्याचबरोबर राज्यातील पशुधनास आरोग्याच्या मोफत सेवा पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत मिळाव्यात यासाठी पशुसंवर्धन पंधरवडाही आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यामध्ये कॅटल कँप, जनावरांचे लसीकरण तसेच आवश्यक त्या सर्व मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील सेतु व सेवा केंद्रामार्फत सर्वसामान्यांना विविध प्रकारचे दाखले, आवश्यक ती कागदपत्रे यासह इतर सुविधा देण्यात येतात. परंतू या केंद्रामार्फत सर्वसामान्यांची फसवणुक करत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे तहसिलदारांनी आपापल्या तालुक्यातील सेतु केंद्राची अचानकपणे पहाणी करुन सर्वसामान्यांच्या अडवणुक करणाऱ्या केंद्रावर कडक कारवाई करण्यात यावी. सेतु केंद्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी शासनामार्फत दर ठरवुन देण्यात आले आहेत. या दरांची यादी सर्व केंद्राच्या दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे विनासायास मिळावीत यासाठी जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांमध्ये सेतु सुविधा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांची सेतु सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी असेल त्यांना मंजुरी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालयामध्ये सेतु सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नव्याने शासनाने योजना सुरू केल्या असल्याचे सांगत पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण ही अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 6 लक्ष 80 हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. या योजनेच्या लाभापासुन जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, यादृष्टीने काळजी घेत ही योजनेची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.
युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातुन पात्र उमेदवारांची या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करुन घेण्यात यावी. पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या योजनेंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्ह्यातील शासकीय तसेच खासजी आस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे व मागणीनुसार उमेदवारांची शिफारस करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना आदी योजनांचा सविस्तर आढावा घेत शासकीय यंत्रणेबरोबरच पदाधिकाऱ्यांनाही या योजना जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहभागी करुन घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.
बैठकीस योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.