मुंबई, दि. २६
यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लीटर सोयाबीन तेल या शिधाजिन्नांचा समावेश असणार आहे. या ‘आनंदाचा शिधा’ संच्याचे वाटप दि. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्य्र रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या ‘आनंदाचा शिधा’ संचचा लाभ मिळणार आहे.
प्रती शिधापत्रिका १ शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६२.५१ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.