चापडगाव येथे अफूची प्रतिबंधित झाडे लागवडीवर पोलिसांची कारवाई; 47.64 लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत (अहिल्यानगर): कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे प्रतिबंधित अफू (अफू गवत) लागवड करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि कर्जत पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 47,64,180 रुपयांच्या किमतीची अफूची प्रतिबंधित झाडे जप्त केली आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड व विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

दरम्यान, कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत माहिती गोळा करत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की परमेश्वर बन्सी घनवट (वय 68, रा. चापडगाव, ता. कर्जत) हा आपल्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफूच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करत आहे.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कर्जत पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व त्यांच्या पथकाच्या मदतीने चापडगाव शिवारातील शेती गट क्रमांक 13 येथे छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान शेतात एक व्यक्ती राखण करताना आढळून आली. चौकशी केल्यावर त्याने आपले नाव परमेश्वर बन्सी घनवट असल्याचे सांगितले.

पोलीसांनी शेताची तपासणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात अफूची झाडे लावलेली आढळली. आरोपीने ही झाडे सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी लावून त्यांची काळजी घेत असल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी 238.239 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्याची बाजारमूल्य 47,64,180 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शामसुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 93/2026 नोंदविण्यात आला आहे. आरोपीवर गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क) आणि 15(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे (कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व कर्जत पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles