मागण्यांबाबतचा अध्यादेश मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही – मनोज जरांगे पाटील
नवी मुंबई,
Manoj jarange patil in new mumbai शंभर टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना सर्व क्षेत्रातलं शिक्षण मोफत करावं ,सरकारी नोकरभरतीची प्रक्रिया राबविताना मराठा समाजाच्या जागा राखून ठेवाव्यात,
अंतरवालीसह सर्व महाराष्ट्रात मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि मान्य झालेल्या आमच्या मागण्यांसदर्भातील अध्यादेश काढून त्याची प्रत आम्हाला द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे आज केली.
नवी मुंबईत वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेतलेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, २६ जानेवारी या दिवसाचा मान राखून आम्ही मराठा आंदोलनकर्ते मुंबईत जाणार नाही. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या असून सरकारनेही मान्य केल्या आहेत.
मात्र त्याबाबतचा अधिकृत अध्यादेश उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत आम्हाला मिळाला नाहीतर आम्ही मुंबईत जाणारच असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
आतापर्यंत ५४ लाख नाही तर ५७ लाख मराठा कुणबी नोंदी मिळाल्या असून ३७ लाख मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याचे शासनाने जाहीर केले आहेत. मात्र ज्यांना प्रमाणपत्र दिली आहेत, त्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहीजे.म्हणजे नेमके कुणाला प्रमाणपत्र दिली याची खातरजमा करता येईल.
शिवाय ज्या मराठ्यांची नोंद नाही, त्यांना प्रमाणपत्र मिळालेल्या नातेवाईकांनी शपथपत्रावर माझा नातेवाईक असे लिहून द्यावे आणि ज्यांना अशी शपथपत्रे मिळतील, त्यांनाही लगेचच प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासंदंर्भात शासनाने नियुक्त केलेल्या शिंदे समितीची मुदत २ महिन्यांसाठी वाढवून दिली गेली आहे. ती मुदत वर्षभर करावी. तसेच या समितीने संपूर्ण महाराष्ट्रात काम करावे अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे.