महसूल विजय सप्तपदी अभियानाला
श्रीरामपूर येथे सुरुवात
शिर्डी, दि. 7:- शेत जमिनी तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी 1961 सालापासून करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तुकडेबंदीची 5 हजार 730 प्रकरणे आहेत. त्यापैकी श्रीरामपूर तालुक्याशी संबंधित 954 प्रकरणे आहेत. ज्यावेळेस शेत जमिनीचा तुकडा पडला त्यावेळेचे मुल्यांकन ग्राहय धरावे, ही शेतकऱ्यांची मागणी रास्त असून यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज श्रीरामपूर येथे केले.
श्रीरामपूर येथे उत्सव मंगल कार्यालयात महसूल विजय सप्तपदी अभियानास प्रारंभ झाला त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते. याप्रसंगी आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, दयानंद जगताप, गोविंद शिंदे, देवदत्त केकाण, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जमिनीशी संबंधित कायद्यामध्ये सुधारणा झाली. पण त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. कायदे कागदावरच राहतात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. त्यामुळे महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६८ रस्ते, ३१६ पाणंद रस्ते, पाच हजार ७३० जमीन तुकडे तोडणी भंग प्रकरणे, जागेअभावी सात हजार ६७० बेघर, ३५० गावांत भुसंपादन कार्य प्रलंबीत असून ते अभियानाद्वारे ३१ मार्चअखेर प्रशासनाकडुन प्राधान्याने सोडविले जाणार आहे. प्रशासनाने समोपचाराने प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सर्वांनी अभियानात सहभागी होवून प्रश्नांची सोडवणूक करावी. याकडे केवळ महसूल प्रशासनाचे प्रश्न म्हणून बघून चालणार नाहीत. तर सर्वांना मिळून काम करावे लागेल. कायदे केवळ पुस्तकात राहून उपयोग होत नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वादाच्या रस्त्यावर जावून अडथळा दुर करावा.
शिर्डी-श्रीरामपूर महसूल विभागाने बैठक घेवून रखडलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, तसेच श्रीरामपूर विभागाने तातडीने सार्वजनिक स्मशानभुमी उभारण्यासाठी जागा मागणीसाठी प्रस्ताव देण्याची सुचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केली.
महसूल विजय सप्तपदी अभियानाला श्रीरामपूर येथे
याप्रसंगी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी मार्गदर्शन केले.
उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. तर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आभार मानले. तहसीलदार स्वाती देवरे यांनी अभियान गीत सादर केले.
शेतीसाठी रस्ते, पाणंद रस्त्याची दुरुस्ती, अतिक्रमणे काढणे, घर नसणाऱ्या कुटुंबासाठी घरकुलाला जागा देणे, स्मशानभूमी नसणाऱ्या गावांना त्यासाठी जागा देणे आदि सात प्रकारची सर्व सामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने अहमदनगर जिल्ह्यात महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येत आहे. 7 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे.
कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, महसूल व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा:राज्यव्यापी कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा शुभारंभ
[…] […]
[…] […]