जामखेड,
Ahmednagar Jamkhed अहमदनगर – जामखेड या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या कामाची गती वाढविण्याच्या कडक शब्दात सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात अहमदनगर – जामखेड, जामखेड – सौताडा या महामार्गाच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेताना या कामात येणाऱ्या अतिक्रमण, बांधकाम तसेच विविध अडचणी बाबत संबंधित अधिकारी यांनी बैठकीत मांडल्या असता या अडचणीची सोडवणूक खा. विखे यांनी वरिष्ठ पातळीवर तसेच संबंधितांशी बोलून केली.
याशिवाय अहमदनगर – जामखेड या महामार्गाच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेवून काम अधिक गतीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या तसेच जामखेड सौताडा मार्गाचा ही आढावा घेताना शहरातील अतिक्रमण हे तात्काळ काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी देवून हा मार्ग देखील अधिक गतीने पूर्ण करावा असे सांगितले.
या बैठकीस जामखेड येथे प्रांत अधिकारी साळुंके मॅडम , तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जत तहसीलदार नितीन पाटील , नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता तरडे, पवार मॅडम , भूमिअभिलेखचे अधिकारी पाटील यांची उपस्थिती होती.
आरोळे वस्तीला पायाभूत सुविधा देण्याचा सूचना
जामखेड शहरातील आरोळे वस्ती या भागातील महिलांनी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट घेवून तीर्थ यात्रे बद्दल आभार व्यक्त करून आरोळे वस्तील नाली, रस्ते तसेच घरकुल योजनेच्या माध्यमातून घर देण्या बाबत मागणी केली, या मागणीवर खा.विखे यांनी तात्काळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी साळवे यांना मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.