तिसगाव
pm modi invited ahmednagar farmer नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रितांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या विशेष निमंत्रितांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील सोमठाणे खुर्द येथील श्री दक्षिणायन ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड या कंपनीचे श्रीकांत बंडू जाधव आणि त्यांच्या आई सखुबाई बंडू जाधव हे दोघे स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारने त्यांच्या एफपीओचे कार्य ओळखून त्यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रित केल्यामुळे जाधव कुटुंबीय अत्यंत आनंदित झाले आहे. श्री दक्षिणायन ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड तिसगाव या एफपीओने 750 शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या डाळींब, संत्रा आदी फळांची विक्री करून त्यांना चांगला नफा मिळवून दिला आहे. पाथर्डी तालुका आणि परिसरातील अनेक शेतकरी या एफपीओमध्ये कार्यरत आहेत.
श्री दक्षिणायन ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड तिसगाव या कंपनीचे श्रीकांत जाधव हे मुख्य कार्यकारी अधिकारी तर त्यांच्या आई सखुबाई जाधव या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीचे 10 संचालक असून 750 सदस्य आहेत. 2000 शेतकऱ्यांना जोडण्याचा या कंपनीचा मानस आहे. महाराष्ट्र राज्यातून केंद्र सरकारच्या 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत या कंपनीची स्थापना झाली आहे.
गेल्या दिड वर्षापासून नाबार्ड आणि अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सहयोगाने श्री दक्षिणायन कंपनी काम करत आहे. कंपनीच्या आजुबाजुच्या परीसरातील 750 शेतकरी सभासदांना सोबत घेऊन डांळिब, संत्रा, मोसंबी आणि ज्वारी तसेच सर्व प्रकारची मिलेट खरेदी – विक्रीचे काम ही कंपनी करते. आत्तापर्यंत या कंपनीने दिल्ली, कानपुर, बिहार, सिलीगुडी असे मार्केटस्, तसेच आय टी सी आणि रिलायन्स सारखे कार्पोरेट मार्केटस् सभासदांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची खरेदी विक्री या कंपनीमार्फत यशस्वीपणे चालु आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला चांगला दर मिळवुन दिला जात असल्याने शेतकरी सभासदही समधानी आहेत.
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारमार्फत या कंपनीच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्याने कंपनीचे संचालक आणि सभासद यांच्यात आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. श्री दक्षिणायन कंपनीने पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत मिलेट फुड प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यासाठी श्रीकांत जाधव यांनी प्रस्ताव सादर केला आहे. या केंद्र सरकारच्या योजनेचा देश आणि राज्यातील अल्पभुधारक शेतकरी वर्गाला निश्चितच फायदा होणार आहे. जेणेकरुन शेतकरी एकत्र येऊन आपल्या शेतमालाची किंमत ठरवु शकणार आहेत.
कृषी मालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करणे ही शेतकरी उत्पादक संघटनांच्या स्थापनेमागील संकल्पना आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभतेने होण्यासाठी, केंद्रीय कृषी आणि सहकार विभागाने छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यवसाय संस्थेच्या स्थापनेचा नियम केला जेणेकरून शेतकरी उत्पादक संघटनेच्या स्थापनेसाठी राज्य सरकारांना पाठबळ मिळेल. शेतीसाठी लागणारे घटक ते हाती आलेले पीक अशा प्रत्येक कार्यात सदस्य शेतकऱ्यांसाठी संघटक म्हणून काम करणे ही एफपीओची जबाबदारी आहे. संघटनेच्या स्थापनेमुळे मोठ्या प्रमाणातील कार्यातून होणारी काटकसर तसेच सदस्य शेतकऱ्यांची वाटाघाटीची क्षमता यामध्ये सुधारणा होते.
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी श्रीकांत जाधव आणि त्यांच्या आई सखुबाई जाधव यांना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या 250 लाभार्थ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘लोकसहभागा’च्या संकल्पनेला अनुसरून, केंद्र सरकारने देशभरातून, समाजाच्या विविध घटकांतील लोकांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी दिल्लीत आलेल्या विशेष पाहुण्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारक तसेच पंतप्रधान संग्रहालय या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.