Beed rape crime संतापजनक.. मागून खाणाऱ्या अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
बीड
Beed rape crime पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक माणुसकीला काळीमा फासणारी, संतापजनक घटना बीडमध्ये समोर आलीय. शहरात मागून खाणाऱ्या अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुकलीला, खाऊचे अमिश दाखवून उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरातील क्रीडांगणाच्या परिसरात असणाऱ्या शौचालयामध्ये रात्री 9:30 ते 10 च्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावर रक्ताचे डाग देखील आढळून आले आहेत.
प्राथमिक माहितीवरून 3 ते 4 नराधमांनी त्या चिमुकल्या मुलीला खाऊच आमिष दाखवून या क्रीडांगणाच्या शौचालयाच्या परिसरात नेल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी पीडित मुलगी ज्यावेळेस मोठमोठ्याने ओरडायला लागली, त्यानंतर हा सर्व प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला आणि त्या ठिकाणाहून नराधम अज्ञातांनी तिथून धूम ठोकली
या घटनेची माहिती कळताच, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम घटनाथळी दाखल झाले होते.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत, पीडित चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आज पहाटे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात आरोपीवर कलम 376, पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांनी, तीन ते चार जण त्या ठिकाणी होते, मुलीने आरडाओरड केल्यावर ते पळत गेले. अशी प्राथमिक माहिती दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात एक आरोपी होता का तीन ते चार जण सहभागी होते ? याचा तपास करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडं सर्वांचे लक्ष लागलंय
दरम्यान मागून खाणाऱ्या एका अंध महिलेच्या चिमुकल्या मुलीवर उचलून नेऊन अत्याचार केल्याने, एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळं पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा गुन्हेगारांना कडक शासन करायलाचं हवं. अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.