चास येथील सोसायटी कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
अकोले / प्रतिनिधी
Villagers locked the Society Office at Chas akole अकोले तालुक्यातील चास येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतून दिव्यांग शेतकरी गोरक्ष कहाणे यांना हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध करुन सोसायटी कार्यालयाला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत अध्यक्षावर कारवाई होत नाही तोपर्यंत टाळे न खोलण्याचा पवित्रा घेतला आहे.
शेतकऱ्यांची विविध कामे सेवा सहकारी सोसायटीद्वारे होत असतात. त्यानिमित्तानेच सभासद असलेले दिव्यांग शेतकरी गोरक्ष कहाणे कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांना व पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. तुमची लायकी नाही, तुमची वाटच लावतो अशी धमकी देत त्यांना कार्यालयातून हाकलून दिले.
ही वार्ता ग्रामस्थांना समजताच तत्काळ कैलास शेळके, संपत पवार, दत्तु शेळके, बाळासाहेब शेळके, राजेंद्र शेळके, भाऊराव गोडसे, किशोर शिंदे, मारुती शेळके, श्रीराम शेळके, कैलास गणपत शेळके आदिंसह ग्रामस्थांनी घटनेचा तीव्र निषेध केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी सोसायटी कार्यालयाला टाळे ठोकले. जोपर्यंत अध्यक्षावर कारवाई होत नाही तोपर्यंत टाळे न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील वातावरण तापले आहे.
तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी,विभागीय महिला अध्यक्ष विद्या करपे,उपाध्यक्ष शांताराम काळे,देविदास शेलार,संतोष बनसोडे यांनी जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठवून चौकशी करण्याची मागणी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.