नगर,
Nagar beed railway accident नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रुळावर आलेल्या गायींना वाचवितांना एका शेतकऱ्याचा तसेच त्याच्या एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे.
नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या सेवेला अद्याप मुहूर्त मिळालेला नसतानाच या मार्गावर अपघातांची मालिका सुरु झाली आहे. या मार्गावर चाचणी सुरू असताना रुळावर आलेल्या गायींना वाचवितांना एका शेतकऱ्याचा तसेच त्याच्या एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे. नगर तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात हा अपघात झाला.या अपघातात एका गायीचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यातील नारायणडोह येथील पांडुरंग दौलत साठे (वय ७५) हे नारायणडोह शिवारात नव्याने टाकण्यात आलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅक नजिक आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले असता हा अपघात घडला. गायी चरत चरत रेल्वे रुळावर आल्या असता चाचणी घेणारे रेल्वे इंजिन समोरून आले. त्यापासून आपल्या गायींना वाचविण्यासाठी पांडुरंग साठे पुढे झाले, मात्र ते गायीला तर वाचवू शकले नाहीत, उलट त्यांनाही आपला जीव गमवावा लागला.
drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा
अपघातानंतर मयत पांडुरंग साठे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व भाऊसाहेब तापकीर यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेल्यावर बिनधास्त असतात. मात्र अधून मधून रेल्वे प्रशासन अचानक चाचण्या घेते. त्यामुळे असे अपघात वारंवार होऊ शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने चाचण्यांच्या दिवशी या मार्गावरील गावांना पूर्व सूचना द्याव्यात अशी मागणी संदेश कार्ले यांनी केली आहे.