अकोले,
Kalsubai tourist news अकोले तालुक्यातील महाराष्ट्राचे ऐवरेस्ट म्हणुन परीचित असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजुर पोलिस स्टेशन व जहागिरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली .
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासुन अतिवृष्टी होत होती . शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपुर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पुर आला होता . शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते .
सकाळी ९ वाजल्यापासुन मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखर खाली उतरुन आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते .तेव्हा काही गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक ११२ ला फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहीती दिली .
हा संदेश तातडीने राजुर पोलिस स्टेशनला प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर झाले .तोपर्यंत जहागिरदार वाडीतील काही व्यवसायीक , गाईड व गावकरी यांनी दोराच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना स्वत: नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहत साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली होती . जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यु ऑपरेशन सुरच होते .
Kalsubai tourist news संध्याकाळपर्यंत एकहजार गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात पोलिस व गावक-यांनी बाजी मारली होती . या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये राजुर पोलिसांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे , पोलिस कर्मचारी अशोक गाढे ,विजय फटांगरे व राकेश मुळाने सामिल झाले होते तर जहागिरदार वाडीतील युवकांची नावे समजु शकली नाहीत.