कृषी कायदा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारा-खा. प्रीतम मुंडे
परळी.दि.२५ डिसेंबर, प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांना पूर्ण करणारे निर्णय घेत आहे.नवा कृषी कायदा देखील शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारा असल्याचे प्रतिपादन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केले आहे.परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या.
यावेळी मंचावर भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,किसान मोर्चाचे उत्तमराव माने,अश्रूबा काळे,बाबासाहेब काळे,सुधाकर पौळ,सुरेश माने यांच्यासह भाजप कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते.पूढे बोलताना खा.मुंडे म्हणाल्या की ‘ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत केली.देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आज प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा अठरा हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग केला,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील मदत करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असल्याचे यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा:बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या व्यक्तीकडून चार तलवारी जप्त
तसेच देशातील गोरगरीबांचे प्रश्न सोडवून त्यांना आवश्यक मदत आणि मजुरांना न्याय देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत असल्याचे सांगताना कृषी कायद्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले,हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे.या कायद्याबाबत काही लोक अपप्रचार आणि संभ्रम पसरवत असले तरी देशातील शेतकऱ्यांनी या कायद्याचे समर्थन आणि स्वागत करणे अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

