Homeताज्या बातम्यासेवाभाव, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचा सेवापूर्ती सोहळ्यात गौरव

सेवाभाव, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचा सेवापूर्ती सोहळ्यात गौरव

अकोले,ता.७ :

Akole rajur news अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक तप ‘वनवास’ भोगत, कष्ट आणि समर्पणाने आयुष्य वेचणाऱ्या शकुंतला मावशी दहितुले यांनी कुटुंबासाठी केलेला संघर्ष आणि विद्यालयात बजावलेली प्रामाणिक सेवा प्रेरणादायी आहे. त्यांच्या कष्ट, त्याग आणि जिद्दीमुळे संसाराचे सोने झाले, असे गौरवोद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले.

श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे ३४ वर्षे निष्ठेने सेवा बजावलेल्या श्रीमती शकुंतला राजेंद्र दहितुले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाचा भावपूर्ण गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष संतोष बनसोडे होते. संस्थेचे सचिव बापू काळे, मुख्याध्यापिका मंजुषा काळे, विलास महाले, विलास तुपे, श्रीनिवास यलमामे, आनंद नवाळी, दर्शन ओहरा, रमेश दहितुले, एडीसी बँकेचे

व्यवस्थापक विलास कडाळी, प्रेमानंद पवार, गोकुळ कानकाटे, राजेंद्र मैड, वर्षाताई शेलार, रजनी टिबे, गणपत देशमुख, आनंद घाणे, मीरा नरसाळे, सचिन देशमुख, तृप्ती दहितुले, महेश दहितुले, अमोल दहितुले आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक सतीश काळे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते दहितुले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. त्यात दहितुले यांच्या सेवाकाळातील कर्तव्यनिष्ठा, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विद्यालयासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

पिचड म्हणाले, “एखाद्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी सातत्य, संयम आणि मेहनत आवश्यक असते. दहितुले यांनी आपल्या सेवाकाळात याच भावनेने काम केले. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीचा टप्पा आला असला, तरी विद्यालयाशी त्यांचे भावनिक नाते कायम राहील.”

“नाईक पदावर काम करताना त्यांनी विद्यालयातील प्रत्येक जबाबदारी आपुलकीने पार पाडली. पूर्वीच्या काळात संगणकाची सुविधा नसतानाही अनुभव आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी कामकाज सांभाळले.

नाईक पद म्हणजे एका अर्थाने ‘सुपर कॉम्प्युटर’च आहे; अनेक गोष्टी मनात अपलोड करून ठेवलेल्या असतात,” अशी मिश्कील टिप्पणी करत पिचड यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी दहितुले यांना उत्तम आरोग्य व आनंदी निवृत्ती जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

‘आईची राहणी साधी; मात्र माणुसकी मोठी’

सुनबाई तृप्ती दहितुले यांनी भावनिक मनोगत व्यक्त करताना सांगितले, “आईची राहणी साधी असली, तरी माणुसकी मात्र मोठी आहे. त्यांनी आयुष्यभर जपलेले संस्कार आणि माणुसकीची शिदोरी आम्हाला मिळाली. आता त्यांनी धावपळ थांबवून नातवंडांमध्ये रमावे आणि त्यांच्या बालपणाचा आनंद घ्यावा.”

मुलगी मानसी राऊत यांनी आईच्या संघर्षमय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी पगार नसतानाही रात्रीच्या वेळी गोधड्या शिवणे, पापड लाटणे तसेच विविध कष्टाची कामे करून त्यांनी कुटुंबाला आधार दिला. त्यांच्या या संघर्षातून पुढील पिढीला कष्ट, जिद्द आणि संस्कारांची प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले.

विद्यालयाच्या वतीने किरण भागवत यांनी दहितुले यांना शुभेच्छा दिल्या.

‘वाढदिवस आणि सेवापूर्तीचा दुग्धशर्करा योग’

संस्थेचे सचिव बापू काळे म्हणाले, “वाढदिवस आणि सेवापूर्ती हा दुग्धशर्करा योग आहे. दहितुले यांनी अनेक वर्षे विद्यालयात मनापासून सेवा केली. विद्यालयाच्या इमारतींना पाणी मारण्यापासून विविध जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण कामातून सेवाभावाचा वटवृक्ष उभा राहिला आहे.”

सेवापूर्तीच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने दहितुले यांना वटवृक्षाचे रोपटे भेट देण्यात आले. हे रोपटे त्यांच्या सेवाभावाचे, संस्कारांचे आणि विद्यालयाशी असलेल्या अतूट नात्याचे प्रतीक असल्याचे काळे यांनी सांगितले. त्यांच्या निवृत्तीमुळे नवीन पिढीला संधी मिळणार असून, त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची ही समाजाकडून मिळालेली पोहोचपावती आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवृत्तीनंतर दहितुले यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘विद्यालयाचे प्रेम आयुष्यभर स्मरणात राहील’

सत्काराला उत्तर देताना शकुंतला दहितुले भावूक झाल्या. “आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय, भावनिक आणि आनंदाचा आहे. या विद्यालयाशी जोडलेले नाते मी कधीही विसरू शकणार नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कष्ट करत संसार उभा केला. आज माझे कुटुंब चांगल्या स्थितीत उभे आहे, याचा मला मनस्वी अभिमान आहे,” असे त्यांनी सांगितले.

विद्यालयाने दिलेले प्रेम, सन्मान आणि आपुलकी आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचा समारोप महेश दहितुले यांनी आभार मानून केला. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंबीय, नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments