पुणे,
राज्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे? महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये आजअखेर ७४ पूर्णांक १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
राज्यातील प्रमुख, मध्यम आणि लघु प्रकल्पांसह एकूण ३ हजार ३२ धरणांमध्ये ३० हजार २७१ पूर्णांक १० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबर रोजी हा साठा ८९ पूर्णांक ५७ टक्के होता. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणसाठ्यात घट झाली आहे.
विभागनिहाय पाहता कोकणात सर्वाधिक ९० पूर्णांक २५ टक्के, पुणे विभागात ८५ पूर्णांक ४८ टक्के, नाशिकमध्ये ८१ पूर्णांक ६६ टक्के, नागपूरमध्ये ७१ पूर्णांक ७८ टक्के आणि अमरावती विभागात ६२ पूर्णांक ८३ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ४४ पूर्णांक १ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, विभागातील ९२९ धरणांमध्ये ३ हजार २१२ पूर्णांक ९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
राज्यातील १३८ प्रमुख प्रकल्पांमध्ये ८२ पूर्णांक ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पुणे विभागातील प्रमुख प्रकल्पांमध्ये ९२ पूर्णांक ९७ टक्के, कोकणात ९४ पूर्णांक २३ टक्के आणि नाशिकमध्ये ९० पूर्णांक ३४ टक्के साठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रमुख प्रकल्पांमध्ये मात्र ५९ पूर्णांक ६४ टक्के साठा आहे.
पुणे विभागातील ३५ प्रमुख प्रकल्पांमध्ये ११ हजार ५३८ पूर्णांक ३४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून तो निर्धारित उपयुक्त साठ्याच्या ९२ पूर्णांक ९७ टक्के आहे.
निरा देवघर, डिंभे, भामा आसखेड, येडगाव, पवना, भाटघर आणि गुंजवणी या प्रकल्पांमध्ये शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. खडकवासला धरणात ४४ पूर्णांक ५० टक्के, तर पानशेतमध्ये ९३ पूर्णांक ३६ टक्के साठा आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील जायकवाडी धरणात ७८ पूर्णांक ६६ टक्के, येलदरीत ६१ पूर्णांक ३८ टक्के, विष्णुपुरीत ८१ पूर्णांक ७३ टक्के, तर माजलगाव धरणात २६ पूर्णांक ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
विभागातील ४४ प्रमुख प्रकल्पांचा एकत्रित साठा ५९ पूर्णांक ६४ टक्के आहे.
एकूणच, राज्यातील धरणसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला, तरी पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीसाठा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून येते.
