अहिल्यानगर
ahilyanagar loksamvad 2026 गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लोककल्याणकारी निर्णय आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत कोपरगाव येथे शासकीय योजनांचा जागर करण्यात आला.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील लोकसहभागाचा मोठा उत्सव आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. या लोकसहभागाचा सकारात्मक उपयोग करून शासनाच्या विविध योजना व निर्णयांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर आणि कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तहसीलदार महेश सावंत यांनी तरुणांना शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध विभागांमार्फत युवक, विद्यार्थी, शेतकरी, महिला तसेच समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांनी समाजमाध्यमांचा वापर करताना नागरिकांनी विशेषतः तरुणांनी सजगता आणि जबाबदारी बाळगण्याचे आवाहन केले. समाजमाध्यमांवर प्राप्त होणाऱ्या संदेशांची सत्यता तपासल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत. अफवा, चुकीची माहिती तसेच फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहून समाजमाध्यमांचा सकारात्मक आणि विधायक उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनीही नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी ‘लोकसंवाद-२०२६’ या उपक्रमाची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला. शासनाच्या विविध योजना, निर्णय आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी गणेशोत्सवासारख्या व्यापक लोकसहभागाच्या उत्सवाचे माध्यम प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय योजनांची माहिती घेणे, पात्रतेनुसार लाभ मिळविणे आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचविणे, हा लोकसंवादाचा महत्त्वाचा भाग आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी स्वच्छतादूत व पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांनी स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मुंबादेवी तरुण मंडळाचे सुनील फंड, संदीप दळवी, संजय जगताप, अरविंद मंडलिक, विवेक फंड, आनंद माळी, आशुतोष दळवी, समर्थ दीक्षित, ओम कपोते यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
