८ तारखेला अहिल्यानगरमधील जाहीर सभेत पक्षप्रवेश होणार
ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
अहिल्यानगर :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते व युवा नेते विक्रम राठोड यांनी उप-मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या ८ तारखेला अहिल्यानगर शहरात होणाऱ्या जाहीर सभेदरम्यान हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विक्रम राठोड यांनी सांगितले की, हा पक्षप्रवेश जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, संभाजीराव कदम यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच
उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पक्षप्रवेश केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या निर्णयाबाबत भूमिका मांडताना राठोड म्हणाले, “सध्या पक्षाकडे कोणत्याही प्रकारची निवडणूक तिकीट किंवा पदाची मागणी केलेली नाही. मात्र भविष्यात पक्षाने जबाबदारी दिल्यास ती निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन.”
शिवसेनेशी आपल्या कुटुंबाचे जुने नाते असल्याचे नमूद करत ते म्हणाले, “धनुष्यबाण हे चिन्ह आमच्या कुटुंबासाठी भावनिक व ऐतिहासिक आहे. आमचे वडील स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांनी सुमारे २५ वर्षे शिवसेनेत निष्ठेने काम केले. त्यांच्या निधनानंतरही आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.”
काळानुरूप पक्षांतर्गत संवाद, जबाबदाऱ्या आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकांबाबत अडचणी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“कार्यकर्त्यांना योग्य संधी, स्पष्ट दिशा आणि संघटनात्मक बळ मिळणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यांना न्याय देणारे नेतृत्व म्हणून उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहतो,” असे राठोड यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही विविध राजकीय घडामोडी घडल्याचे नमूद करत, त्या संदर्भात वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “खंबीर नेतृत्व आणि संघटनात्मक स्पष्टतेच्या अपेक्षेने हा निर्णय घेतला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ८ तारखेला होणाऱ्या या पक्षप्रवेशाकडे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

