अहिल्यानगर, 27 नोव्हेंबर ,
shrigodna belvandi crime कोळगाव शिवारात 8 महिन्यांच्या बालकाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. बेलवंडी पोलीस ठाण्याला दुपारी 12 वाजता मिळालेल्या दूरध्वनी संदेशातून ही घटना उघडकीस आली.
विहिरीत तरंगताना दिसला बालकाचा मृतदेह
नहेरमळा, कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील सुदाम दळवी यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा नातू कार्तिक योगेश दळवी (वय 8 महिने) याचा मृतदेह तरंगताना आढळला. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखालील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बालकास विहिरीबाहेर काढण्यात आले.
नातेवाईक अशोक रामकृष्ण दळवी यांच्या तक्रारीवरून आ.मृ. क्रमांक 76/2025 अन्वये प्रारंभी तपास सुरू करण्यात आला.
घरच्यांकडून टाळाटाळ; पोलिसांचा संशय बळावला
तपासादरम्यान घरातील सदस्य – कार्तिकची आई सोनाली, चुलती सुषमा व चुलते ज्ञानेश्वर – यांच्याकडे चौकशी झाली. मात्र तिघांकडून मिळणारी माहिती विसंगत व टाळाटाळ करणारी असल्याने पोलिसांचा संशय वाढला.
तपास अधिक तीव्र करत पोलिसांनी घटनेचा उलगडा करण्यासाठी सखोल चौकशी केली. या दरम्यान कार्तिकची आई सोनाली योगेश दळवी हिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
आईकडून रागाच्या भरात बालकाची हत्या – कबुली
सोनाली हिने पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितले की,
“सकाळी 10.30 वाजता घरात कोणी नसताना, रागाच्या भरात मी झोपलेल्या कार्तिकला झोळीतून काढून ब्लॅंकेटमध्ये गुंडाळले आणि घराजवळील विहिरीत टाकून दिले.”
कार्तिकचे वडील योगेश दळवी यांनी सांगितले की, पत्नी सोनाली ही किरकोळ कारणावरून चिडचिड करीत असे व मानसिक तणावात होती. त्यांच्या फिर्यादीवरून गु.र. नं. 400/2025, भा.दं.वि. कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
एक तासात गुन्ह्याचा उलगडा; आरोपी आई अटकेत
घटनेच्या एका तासात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणत महिला आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी
हि कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी (कर्जत विभाग) प्रविणचंद्र लोखंडे व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात—
नंदकुमार सोनवलकर (एपीआय), पवार (पीएसआय), हवालदार भाऊसाहेब यमगर, रवींद्र औटी, पो.कॉ. कैलास शिपनकर, दादासाहेब क्षिरसागर, विनोद पवार, मपोना सुरेखा वलवे, मपोना अविंदा जाधव आणि चालक हवालदार भाऊसाहेब शिंदे—या सर्वांचा समावेश होता.

