बीड | दिनांक 13 नोव्हेंबर 2025:
परळी बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे सोन्याचे मिनी गंठण चोरणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश संभाजीनगर व परळी पोलिसांनी केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एकूण ₹6.45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी प्रतिक विलास वाघमारे (रा. अंकुश नगर, ता. व जि. बीड) यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आई सुनिता विलास वाघमारे या दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेडहून बीडकडे जात असताना परळी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे ₹1,45,000/- किंमतीचे मिनी गंठण चोरी केले. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 230/2025 कलम 303(2) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले. तपास अधिकारी पो.ह. 416 साजिद पठाण यांनी परळी बसस्थानक व शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपी ऑटोमध्ये बसून बसस्थानकातून बाहेर जात असल्याचे दिसून आले. पुढील तपासात पोलिसांनी आरोपींनी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH-04-JB-1560) शोधून काढली. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी नरसिंग कोंडीबा बंन (वय 38, रा. गांधी नगर, उदगीर, जि. लातूर) व त्याच्या दोन महिला साथीदारांना ओळख पटवून अटक केली.
आरोपींकडून चोरीस गेलेले ₹1,45,000/- किंमतीचे 13 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, तसेच ₹5,00,000/- किंमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ₹6,45,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपरा. पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. धनंजय ढोणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, संदीप चव्हाण, पो.ह. साजिद पठाण, पो.शि. शंकर डॉगळे, व्यंकट डोरणाळे व भगवान चव्हाण यांचा समावेश होता.

