मुंबई
Beed class sexual harrasment माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीड शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी केलेल्या मागणीला राज्य सरकारने २४ तासातच मान्य केले असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एका वरिष्ठ महिला आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) मार्फत केला जाणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात केली आहे.
बीड येथे घडलेले प्रकरण अतिशय गंभीर व माणुसकीला आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणात अशाच प्रकारे आणखी काही मुलींचे देखील लैंगिक शोषण झाल्याची शंका नाकारता येत नाही, त्यामुळे असे प्रकार घडलेल्या मुलींनी आता स्वतःहून समोर येऊन तक्रार द्यावी, या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागावा, यातील दोषी व त्यांना मदत करणारे तसेच त्यांना राजकीय किंवा सामाजिक बळ देणारे हे कोण आहेत, ते निष्पन्न व्हावेत व त्यांना कठोर शिक्षा व्हावी, ही सरकारची व नवनियुक्त SIT समितीची भूमिका असेल, दोषी असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे यांच्या सह आज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनीही आज हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. दरम्यान या तपास पथकाला कालमर्यादा निश्चित करून दिली जाणार असून, त्यांनी दिलेल्या वेळेत तपास पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे, असेही श्री फडणवीस म्हणाले.
या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांनी आपण केलेली मागणी राज्य सरकारने २४ तासांच्या आत मान्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले असून, या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळेपर्यंत आपण हे प्रकरण लावून धरू असा निर्धार मुंडेंनी व्यक्त केला आहे.

