परळी (दि. 23) –
वात्सल्य योजना 2022 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मला निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या यांसारख्या सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांची सेवा करायची संधी मिळाली. विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, अनुदान याव्दारे या निराधार व दुर्बल घटकांचे आयुष्य सुखकर करता यावे, यासारखा दुसरा आनंद कशातच नाही. परळी तालुक्यातील सुमारे 25 हजार लाभार्थी या योजनेतून लाभ मिळवत असुन, आणखी जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ मिळवून देऊन इथल्या प्रत्येक निराधाराचा आधार मला व्हायचं आहे, असे वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
परळी येथे आयोजित मिशन वात्सल्य vatsalya yojna व विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींना लाभ वितरण व संवाद मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते.
परळी येथे प्रथमच मिशन वात्सल्य अंतर्गत कोविड मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या लाभातून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी 5 लाखांचे धनादेश, एक पालक गमावलेल्या बालकांना प्रतिमाह 1100 रुपये सांगोपन निधी , विधवा झालेल्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ, यासह विधवा महिलांना नगर परिषदेच्या माध्यमातून 5 हजार रुपयांची आर्थिक मदत आदी योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतून नवीन लाभ मंजूर झालेल्या महिलांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींना एकरकमी 20 हजार रुपयांचे धनादेश वाटप, अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड वाटप, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून बचत गटांना प्रत्येकी दीड लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप यासह श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीना मंजुरी पत्रांचे वाटप करण्याचा महामेळावा परळी येथे संपन्न झाला.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी कोविड काळात त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील लोकांना सर्व प्रकारच्या केलेल्या मदतीचा उल्लेख करत सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले व त्यांच्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. कोविड काळातील निर्बंधांमुळे मतदारसंघातील जनतेशी असलेला संवाद काही प्रमाणात कमी झाला होता, त्यामुळे ज्याप्रमाणे परळी शहरात दर रविवारी संवाद अभियान सुरू केले आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन माय बाप जनतेशी संवाद साधणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मतदारसंघात विशेष सहाय्य विभागाच्या किंवा आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांना आधार देणाऱ्या कोणत्याही योजनेतील एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एक मोहीम हाती घेऊन काम करावे, त्यांना कोणतीही अडचण आल्यास मी पाठीशी उभा आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला विविध योजनेतील प्रलंबित अर्ज देखील तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच ना. मुंडे यांनी संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ पौळ व समितीतील सर्व सदस्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास आ. संजय भाऊ दौंड, ज्येष्ठ नेते एम टी नाना देशमुख, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई तुपसागर, सूर्यभान नाना मुंडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, प्रा. मधुकर आघाव, माणिकभाऊ फड, अय्युब भाई पठाण, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, चंद्रकांत फड, भाऊसाहेब नायबल, प्रा। विनोद जगतकर, विष्णुपंत देशमुख, सुरेश फड यांसह अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, बीडीओ संजय केंद्रे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह पदाधिकारी व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
वात्सल्य योजना 2022 योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणीही एजंटगीरी करू नये, कोणी पैसे मागितले तर तक्रार करा – आ. संजय दौंड
दरम्यान मुख्यमंत्री वात्सल्य योजना साठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब हे निधीची कमतरता भासू देत नाहीत. काही लोक ठिकठिकाणी एजंटगीरी करून फॉर्म भरून देण्यापासून लाभ मिळवून देईपर्यंत लोकांकडून पैश्यांची मागणी करण्याचे प्रकार घडतात. असे प्रकार घडू नयेत यासाठी कोणालाही पैसे देऊ नका, कोणी पैश्यांची मागणी केल्यास आमच्याकडे तक्रार करा, असे आवाहन आ. संजय दौंड यांनी उपस्थितांना केले. यावेळी अजय मुंडे, लक्ष्मणराव पौळ, राजाभाऊ पौळ, बाजीराव धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले.