कोल्हापूर
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कर्नाटक सरकारनं कर्नाटकाच्या सर्व सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल शहराजवळील दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी आपला मोठा फौजफाटा इथं उभा केला आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
आज राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई बेळगावला जाणार होते.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटक प्रवेश बंदी घोषित केली आहे
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोमई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील चाळीस गावं कर्नाटकात सामील करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून सीमाभागात संतापाची मोठी लाट उसळली होती.
राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील बेळगाव दौरा करणार होते. मात्र तो दौरा त्यांनी पुढे ढकलला आहे.
आज, पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलला आहे. आमचा सीमाभागात जाण्याचा दौरा होता. याबाबत आम्ही कर्नाटक सरकारला कळवलं होते. बेळगावमधील गावात जाऊन त्याच्याशी चर्चा करणार होतो.कर्नाटक सरकारने सीमेवर मोठा बंदोबस्तही लावला. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही कारवाईची भाषा करू लागले होते. हे चुकीचं असून भारतातील कुठलाही व्यक्ती इतर राज्यात जाऊ शकतो. आज महापरिनिर्वाण दिनी जाऊन कुठेही या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.