शिर्डी
शिर्डी एअरपोर्टहून नाईट लॅडींग विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डयन महानिदेशनालय (DGCA) ची टीम मे 2022 अखेर येथील नाईट लॅडींग सुविधेची तपासणी करणार आहे. डीजीसीए ची परवानगी प्राप्त झाल्यावर शिर्डी येथून लवकरात लवकर नाईट लॅडींग सुविधा सुरू करण्यात येईल. अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज येथे दिली.
शिर्डी विमानतळ व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी आज शिर्डी विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिर्डी विमानतळ प्रवेश व निर्गमन सुविधा, अग्नीशमन व्यवस्था, नाईट लॉडींग, कॉर्गो सेवा, काकडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, परिसरातील स्वच्छता अशा विविधांगी प्रश्नांचा आढावा घेऊन त्यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली.
व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, शिर्डी विमानतळ हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे विमानतळ आहे. शिर्डी येथून आतापर्यंत २ लाख किलो मालची निर्यात करण्यात आली आहे. कार्गोने भाजीपाला,फुले व फळे हे बेंग्लोर, चेन्नई व दिल्ली येथे नियमित पाठण्यात येत आहे. ही सुविधा अजून व्यापक व मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी २० कोटी रूपये खर्चून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून कॉर्गो हब बांधण्यात येणार आहे.
काकडी गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसोबत सखोल चर्चा करून तेथील पाण्याच्या टाकीची संपूर्णपणे डागडुजी करून दुरस्ती करण्यासाठी लवकरात लवकर निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रस्ता, शाळा,कॅटीन याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. विमानतळावरील विक्रेत्यांच्या अडी-अडचणी यावेळी जाणून घेऊन त्यांच्या हिताचे योग्य ते निर्णय जागेवर देण्यात आले. विमानतळावरील अग्नीशमन यंत्रणेचा आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती श्री.दीपक कपूर यांनी दिली.
शिर्डी एअरपोर्ट : कार्गो क्षमता वाढविण्यासाठी कॉर्गो हब बांधणार
शिर्डी विमानतळावरील प्रवेश व निर्गमन ठिकाणावरील अभ्यागत आरामदायी कक्ष सुविधेविषयी व्यवस्थापकीय संचालक श्री.कपूर म्हणाले, अभ्यागत आरामदायी कक्ष मधील यात्री- सुविधेची यावेळी सखोल पाहणी करण्यात आली. येथे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या फरशीची तात्काळ दुरूस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव,टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा, स्थापत्य अभियंता कौस्तुभ ससाणे, मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांजणे, अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, अजय देसाई, कृष्णा शिंदे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात सर्वाधिक ऊस बीड मध्ये शिल्लक