अकोले परिचारिकेने केलेल्या लसीकरणाच्या ‘फेरचौकशीचे’ आदेश!

अकोले ,

अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या संगमनेरातील एका परिचारिकेने अकोल्यातील लशींच्या वायल संगमनेरात आणून आपल्या हितसंबंधी नागरिकांचे लसीकरण घडवून आणले होत अकोल्यासह संगमनेरातही खळबळ उडाली होती. खरेतर सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असूनही अकोल्याच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केवळ चौकशीचा फार्स राबवून ‘त्या’ परिचारिकेला एकप्रकारे पाठीशी घातले होते. मात्र गुरुवारी अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्यासमोर हा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर मोठी खडाजंगी झाली व अखेर अकोल्याचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी या गंभीर प्रकरणाच्या सखोल फेरचौकशीचे आदेश दिले आहेत.

     मागील महिन्यात संगमनेरात राहणार्‍या मात्र अकोले तालुक्यातील ‘खिरविरे’ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणार्‍या एका परिचारिकेने संगमनेरात काही जणांचे लसीकरण घडवून आणले होते. याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यात तथ्य आढळल्यानंतर  एकीकडे अकोल्यातील आदिवासी बांधव लसीकरणासाठी भल्या पहाटेपासून रांगा लावून तासन्तास लशींची प्रतिक्षा करीत असतांना त्यांच्या हक्काच्या लशी कोणत्याही वरीष्ठ अधिकार्‍याच्या परवानगीशिवाय परस्पर कार्यक्षेत्राच्या बाहेर नेल्याने व लाभार्थ्यांशिवाय अन्य नागरिकांचे लसीकरण केले गेल्याने अकोल्यासह संगमनेरातूनही संताप उसळला. 

    अकोले तील ‘लशी’ परस्पर संगमनेर तालुक्यात गेल्याने अकोल्यातील संताप शांत करण्यासाठी इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले. त्यानंतर अकोल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन ‘खिरविरे’ प्राथमिक केंद्रातील कोणत्याही लशी गहाळ झाल्या नसल्याचा अहवाल त्यांना सोपवून सदरचे प्रकरण एकप्रकारे बंद केले. मात्र नंतरच्या कालावधीत लशींचा मोठा तुटवडा निर्माण होवून अकोल्यात अव्यवस्था निर्माण झाल्याने लसीकरणाबाबत  अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी अधिकार्‍यांसह आढावा बैठकीचे आयोजन केले होते. 

     हा विषय अतिशय गंभीर स्वरुपाचा असून दोषी असलेल्यांना पाठीशी घातले जावू शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाला गांभिर्याने का घेतले गेले नाही असा सवाल त्यांनी अधिकार्‍यांना विचारला. त्यावर अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर अकोल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील लशींच्या वायल अन्यत्र गेल्याच नसल्याचा आश्‍चर्यकारक निष्कर्ष काढला व तसा अहवाल सोपविल्याची बाब त्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली.  आमदारांनी या प्रकरणाची अतिशय गांभिर्याने दखल घेवून तत्काळ सखोल चौकशी करण्याची सूचना केली, त्यानुसार तहसीलदार मुकेश कांबळे यांनी तालुक वैद्यकीय अधिकार्‍यांना सखोल चौकशी करण्याचे फेरआदेश बजावले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles