कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाला वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर
राहुरी विद्यापीठ,
Vasantrao Naik Award announced for cast project in MPKV महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतीक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्यातून हवामान अद्ययावत व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र (कास्ट) हा प्रकल्प सन 2018-2023 या कालावधीत राबविण्यात आला.
या प्रकल्पाला या वर्षासाठीचा उल्लेखनीय कृषि योगदान पुरस्कार मुंबई येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतीष्ठानच्या वतीने जाहीर झाला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजे दि. 1 जुलै, 2024 रोजी मुंबई येथे होणार्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला होता. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुनील गोरंटीवार, सह प्रमुख अन्वेषक डॉ. मुकुंद शिंदे व त्यांच्या टीमने नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये खेचून आणला.
मागील पाच वर्षामध्ये या प्रकल्पातर्फे विद्यार्थी, प्राध्यापक व शेतकरी या सर्वांसाठी अत्यंत मोलाचे संशोधन व भविष्यातील शेतीच्या दृष्टीने महत्वाचे असे बळकटीकरणाचे कार्य झाले आहे. या प्रकल्पातर्फे जे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. त्याचा लाभ गेल्या तीन वर्षात सुमारे 70,000 प्रशिक्षणार्थींना झाला आहे. कास्ट प्रकल्पातर्फे झालेले शेतीचे बळकटीकरण निश्चितच महाराष्ट्रासाठी व देशासाठी भुषणावह असे आहे.