खा. लंके यांच्या शपथेनंतर नगर दक्षिण मतदारसंघात जल्लोष

ahmednagar loksabha election result nilesh lanke ncp wins
ahmednagar loksabha election result nilesh lanke ncp wins

इंग्रजीतून शपथ घेत खा. लंके यांनी दिला आश्चर्याचा धक्का !

 

in article

फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी 

  नगर :  प्रतिनिधी

 Swear in English. Lanke gave a surprise!इंग्रजीमध्ये शपथ घेत नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. मी जे इंग्रजी, हिंदी बोललो ते महिनाभर पाठ करा, तुम्ही बोललात तर मी लोकसभा निवडणूकीचा अर्जही भरणार नाही असे आव्हान देणाऱ्या माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रत्युत्तर देत खा. नीलेश लंके यांनी संसदेत मंगळवारी सकाळी इंग्रजीमध्ये शपथ घेतली. लंके यांच्या शपथविधीनंतर पारनेर तालुक्यासह संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघात फटाक्यांची आतषबाजी करीत खा. लंके यांच्या जयजयकाराची घोषणाबाजी करण्यात आली. 

      खा. नीलेश लंके हे मंगळवारी सकाळी २९८ क्रमांकावर शपथ घेणार असल्याचे जाहिर करण्यात आल्याने लंके समर्थकांसह मतदारसंघातील नागरीकांचे डोळे दुरचित्रवाहीनीवर दाखविण्यात येत असलेल्या थेट प्रक्षेपणाकडे होते. नाव पुकारण्यात आल्यानंतर लंके यांनी आपल्या आसनावरून उठून अध्यक्षांशेजारील डायसवर ते गेले आणि त्यांनी थेट इंग्रजीमधून शपथ घेण्यास सुरूवात केली. लंके यांनी शपथ घेतल्यानंतर ते अध्यक्षांजवळ जाऊन नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचेही दर्शन घडविले.

   लोकसभा निवडणूकीदरम्यान भाजपाचे उमेदवार मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी नीलेश लंके यांना इंग्रजी बोलण्यावरून हिणवल्यानंतर तो मुद्दा चांगलाच गाजला. विविध वृत्तवाहिन्यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर मात्र मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठविली होती. इंग्रजीचा मुद्दा चांगलाच गाजलेला असल्याने इंडिया आघाडीच्या खासदारांना त्याची कल्पना होती. लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतल्यानंतर इंडिया आघाडीच्या सभागृहातील खासदारांनी बाके वाजवून लंके यांचे कौतुक केले. 

▪️चौकट 

रामकृष्ण हरी 

शपथ पुर्ण झाल्यानंतर लंके यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी म्हणत डायस सोडले. लंके यांनी वारकरी सांप्रदायातील रामकृष्ण हरी हा परवलीचा शब्द  आपल्या शपथेनंतर उच्चारल्याने वारकरी सांप्रदायाकडूनही त्यांचे कौतुक करण्यात आले. विधानसभेत शपथ घेतानाही लंके यांनी रामकृष्ण हरी हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर वारकरी सांप्रदायाच्या वतीने लंके यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. 

▪️चौकट 

नीलेशचा आम्हाला अभिमान !

संसदेत मराठीतच काय कोणत्याही भाषेत बोलता येते. संबंधित व्यक्ती ज्या भाषेत बोलते त्याचे तिथे भाषांतर होते. एखादी व्यक्ती जनमानसात काम करणारी, ती संसदेमध्ये जात असेल तर त्या व्यक्तीच्या भाषेवरून प्रश्‍न उपस्थित करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. मात्र शपथ घेताना नीलेशने त्याला उत्तर दिले याचा आम्हाला अभिमान आहे. 

खा. शरद पवार 

अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 

▪️चौकट 

नीलेशने स्वप्न पुर्ण केले 

नीलेश आज खासदारपदाची शपथ घेत आहे त्याचा आम्हाला, आमच्या नातेवाईकांना व सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे. मतदारसंघातील सर्व तालुक्यातील जनतेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. नीलेश काहीतरी करून दाखवेल असे आमचे सर्वांचे स्वप्न होते. खासदारपदाच्या निवडणूकीत यश संपादन करून त्याने आमचे स्वप्न पुर्ण केले आहे. 

शकुंतला लंके 

खा. नीलेश लंके यांच्या मातोश्री 

▪️चौकट 

लोकांच्या साथीमुळे नीलेशचा विजय सुकर 

सुरूवातीपासून आम्ही नीलेशला व्यवसायाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र त्याची ओढ समाजकारणाकडे होती. इयत्ता आठवीमध्ये असताना मधल्या सुटीमध्ये हिंदू-हदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हे पारनेर येथे सभेसाठी जात असताना हंगे येथे थांबले होते. नीलेश तिथे गेल्यानंतर स्व. ठाकरे यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर तो इतका चंचल झाला की पुढच्या काळामध्ये तो समाजाशी एकनिष्ठ राहिला. पुढे संघटनशक्ती वाढत गेली. त्यावेळेपासून अगदी ग्रामपंचायत ते खासदारपदापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्‍न त्याने स्वतः हाताळलेले आहेत. महाराष्ट्रालाही वाटत नव्हते की नीलेश ही लढाई जिंकेल. धनशक्ती विरूध्द जनशक्तीच्या या लढाईमध्ये लोकांनी वर्गणी करून नीलेश यांना निवडणूकीसाठी मदत दिली. दुसरीकडे कारखानदाराविरोधात लढा देणे सोपे नव्हते. मात्र लोकांच्या साथीमुळे नीलेशचा विजय साकार झाला. 

ज्ञानदेव लंंके

खा. लंके यांचे वडील 

▪️चौकट 

संसदेच्या पायरीवर  लंके नतमस्तक 

लोकशाहीचे पवित्र मंदिर  असलेल्या संसदेमध्ये प्रवेश करताना मंगळवारी खा. नीलेश लंके हे संसद भवनाच्या पायरीला स्पर्श करून नतमस्तक झाले.  या सभागृहाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मला उर्जा मिळेल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

▪️चौकट

 अतिक्रमणधारकांकडून आतषबाजी 

लोकसभा निवडणूकीनंतर महसूल विभागाकडून सुपा परीसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. महसूलमंंत्री राधाकृष्ण विखे हे असतानाही अतिक्रमणधारकांना दिलासा मिळू शकला नाही असा रोष त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. अतिक्रमण विरोधी पथकाकडून व्यवसायींकांच्या अतिक्रमणांबरोबच मंदिरेही हटविण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप आहे. माता भगिनी रडत असतानाही त्याची कदर न करता अतिक्रमणे हटविण्यात येऊन रोजी रोटीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले गेले. अतिक्रमणाचा सर्व ठपका विखे यांच्यावर ठेवत आम्ही खा. नीलेश लंके यांनी शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी केल्याचे व्यवसायीक भाऊ निवडूंगे यांनी सांगितले. यावेळी दादा दळवी, सचिन पठारे, हनुमंत भोसले, अक्षय थोरात, अमोल पवार, प्रशांत शिंदे यांच्यासह नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here