सुप्रिया सुळे, जयंत पाटील रविवारी नगरमध्ये
आंदोलनस्थळी झुणका भाकरीचा बेत !
नगर : प्रतिनिधी
Second day of agitation, no solution कांदा तसेच दुधाच्या भावासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनामध्ये दुसऱ्या दिवशीही काही तोडगा निघू शकला नाही.आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी महिलांनी चुली पेटवून आंदोलकांसाठी झुणका भाकरीचा बेत केला होता. खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी भाकरी बनविण्यासाठी पुढाकार घेत खा. लंके यांच्या खांद्याला खांदा लावून आपणही या आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले.
शुक्रवारी दुपारी खा. नीलेश लंके यांनी बैलगाडीतून जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी खा. लंके यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र खा. लंके यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी या प्रश्नांमध्ये ठोस भूमिका मांडावी अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही.
शनिवारी सकाळपासून आंदोलन स्थळी शेतकरी जमण्यास सुरूवात झाली. शेतकरी येताना गायी, म्हशीही घेऊन आले होते. दिवसभरात जिल्हयातून, जिल्हाबाहेरून आलेल्या सर्वपक्षीयांनी खा.लंके यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठींबा देत लंके हेच या प्रश्नावर संघर्ष करून न्याय मिळवून देतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होता. लंके यांनी राज्याच्या राजधानीमध्ये आंदोलन करावे, राज्यातील लाखो शेतकरी त्यात सहभागी होतील अशी ग्वाही यावेळी विविध नेतेमंडळींकडून देण्यात येत होती.
उपस्थितांशी संवाद साधताना खा.लंके म्हणाले की,रात्री मी दुग्ध विकास विभागाचा अहवाल पाहिला. त्यात दुध उत्पादनाचा खर्च ४१ रूपये इतका आहे. प्रशासनावर दबाव आहे. दबाव कोणाचा आहे हे जिल्ह्यातील जनतेला माहीती आहे.त्यामुळे प्रशासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्हाधिकारी हे जिल्हयाचे प्रमुख असतात. त्यांना कायद्याची काहीतरी माहीती असेल असे सांगत खा. लंके यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर खापर फोडले.
आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आम्ही भिक मागतो का ? आमच्या हक्काचे मागतो ना ? दुधाला इतर राज्यात गुजरातमध्ये ४२ रूपये, पंजाबमध्ये ४५ रूपये, तामीळनाडूमध्ये ४३ रूपये दर मिळतो. मग महाराष्ट्रात असे का ? सरकार सांगते आहे की, अनुदान देतो. चार महिन्यांपूर्वी दुधाला जाहिर केलेेले अनुदान २ टक्के शेतकऱ्यांना तरी मिळाले का ? दोन टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले तर पुढाऱ्यांमध्ये धनादेश वाटपासाठी स्पर्धा लागली होती. अनुदानासाठी कागदपत्रे गोळा करण्यास भाग पाडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे असा आरोप खा. लंके यांनी केला.
दरम्यान आज,शनिवारी अनेक आंदोलक जनावरांसह आंदोलनस्थळी पोहचले.शुक्रवारी आंदोलन सुरू झाले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी जनावरे आणली होती.शनिवारी मात्र जनावरांमध्ये आणखी वाढ झाली.काही आंदोलक शेळ्या,मेंढ्या व कोंबड्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते.जनावरांसाठी कार्यकर्त्यांकडून चारा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.खा.लंके यांनी आज सकाळी आंदोलनस्थळी असलेल्या गायींच्या धारा काढल्या.
राणीताईंच्या नेतृत्वाखाली झुणका भाकरीचा बेत
खा. नीलेश लंके यांच्या पत्नी, जि. प. च्या माजी सदस्या राणीताई लंके यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी आंदोलस्थळीच चुली पेटविल्या. राणीताई लंके या भाकरी तयार करण्यासाठी सरसावल्या. इतर महिलांनीही त्यांना मदत केली. काही महिलांनी झुणका तयार करून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना झुणका भाकरीचे जेवण देण्यात आले. खा. नीलेश लंके यांनीही कार्यकर्त्यांसमवेत या झुणका भाकरीचा आस्वाद घेतला.
विखे यांनी नाक कापून घेतले !
७५ टक्क्यांहून अधिक दुध खाजगी दुध संस्था संकलीत करतात. शासनाने जाहिर केलाला ३० रूपये हा दर त्यांना मान्य नसतो. खाजगी संस्था सरकारचा हा आदेश कचरा कुंडीत टाकून देतात. त्यात सरकारची नाचक्की होते. परत असा आदेश काढून राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःचे नाक कापून घेण्याचे काम केले आहे. नाक कापून घेण्याऐवजी विखे यांनी कायदा करावा व शेतकऱ्याला ४० रूपये दर कसा मिळेल हे पहावे कारण कायदेशीर बंधन खाजगी संस्थांवर टाकता येईल.
कॉ. अजित नवले
सुळे, पाटील रविवारी नगरमध्ये
खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खा. सुप्रिया सुळे सकाळी साडेनऊ वाजता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सकाळी अकरा वाजता आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. जिल्हयातील सर्व शेतकरी बांधव, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
[…] आंदोलनाचा दुसरा दिवस, तोडगा नाहीच […]