अहिल्यानगर
RPI Ramdas athavale in shirdi मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात सर्वच स्तरातील घटकांचा व समाज बांधवांचा विचार करुन विविध प्रकारच्या योजना राबवून चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती १७० जागा मिळवुन पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
ना. आठवले कालपासून दोन दिवसांच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी शिर्डी येथे समाज कल्याण अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले की, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा महायुतीला फारसा फायदा झाला नाही. मात्र विधानसभला सर्व जागा लढविण्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचा फायदा महायुतीला नक्कीच मिळेल. बच्चू कडु यांच्या तिसऱ्या आघाडीला फारशी मते मिळणार नाहीत. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेपेक्षा कमी मते मिळतील. आमच्याकडे लोकांची कामे केलेले भक्कम उमेदवार असल्याने हवा कोणाचीही असली तरी निवडून येणारे उमेदवार आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. महायुतीला १७० जागा सहजपणे मिळुन पुन्हा सत्ता येणार आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने लाडकी बहिण योजना तसेच अनेक जातींना स्वतंत्र महामंडळ देण्याचा निर्णय झाला आहे. मराठा,बौद्ध, धनगर आदी समाजाबद्दल अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले आहेत.
आमच्या सोबत मोठा दलीत रिपब्लिकन समाज आणि लोकांशी जोडलेले कार्यकर्ते असल्याने मागील वेळी आम्ही एक विधान परिषदेची जागा मिळण्याची मागणी केली होती. परंतु ती मिळाली नाही. आता विधान परिषदेच्या बारा जागांपैकी महायुतीने सात जागांची नावे जाहीर केली आहेत.अजुनही पाच जागा शिल्लक आहेत त्यात एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची मागणी आठवलेंनी केली. तसेच श्रीरामपूर, देवळाली, भुसावळ या राखीव जागाही आमच्या रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात याव्यात . दोन महामंडळे देखील RPI ला.मिळाली पाहिजेत,अशी अपेक्षाही त्यांनी केली. केवळ मला एकट्याला मंत्रिपद दिले म्हणजे झाल अस नाही तर माझ्या सोबत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या इतरांनाही सत्तेत संधी मिळाली पाहिजे, असेही आठवले म्हणाले.
अहील्यानगर हा मोठा जिल्हा असुन गवागव्वाती रिपाईचे संघटन आहे. रिपाईचे अनेक गट असले तरी माझा गट मोठा आहे. माझा आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत. तेव्हा जिल्ह्यात श्रीरामपूरची राखीव जागा रिपाईला मिळण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. तसेच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी थोडी तडजोड करुन राज्यात रिपाईला ८-९ जागा सोडाव्यात अशीही मागणी ना. आठवले यांनी व्यक्त केली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत आमची म्हणजे रिपाईची महायुती सोबत राहुन पुन्हा सत्तेत आणण्याची भुमिका आहे. त्यासाठी श्रीरामपूर, भुसावळ आणि देवळाली (नाशिक), या तीन जागांपैकी एक – दोन जागा तरी रिपाईला मिळाव्यात. जर जागा कमी देत असाल तर त्या बदल्यात सत्तेत काय देता येईल हेही स्पष्ट केले पाहिजे असेही ना. आठवले यावेळी म्हटले आहे.