मुंबई
Prime Minister Narendra Modi left Hindutva for power पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे. 2014 आणि 2019 चा फोटो त्यांच्या सरकारचा पाहा आणि आता किती हिंदुत्ववादी त्यांच्यासोबत आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईत षणमुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार, आमदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही. मात्र सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व सोडलेल आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडा भारतीय जनता पक्ष हा त्या राज्यामध्ये राबवणार आहेत का? असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रभारींची निवड केलेली आहे, त्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे असं म्हणाले की केंद्रात मंत्री असलेले आज महाराष्ट्रामध्ये प्रभारी म्हणून काम करतायेत त्यांनी देशाची सेवा करावी का पक्षाचा काम करावं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यामध्ये 11 विधानपरिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मात्र मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सुनावण्या आणि निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये बाकी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीरच कसा केला? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. येणाऱ्या काळामध्ये मध्यावधी निवडणुका लागल्या तर शिवसेना हा पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. देशामध्ये मध्यावधी निवडणुका लागाव्यात अशीच आमची इच्छा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार संजय राऊत, भास्कर जाधव यांची भाषणे झाली. नवनिर्वाचित सर्व खासदार आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभारलेले परंतु निवडणुकीमध्ये अपयश आलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.