नांदेड
Nanded tractor fell into well भुईमूग निंदणीसाठी शेतमजुरांना घेऊन येणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने विहिरीमध्ये सात ते आठ शेतमजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्याचवेळी या घटनेतील दोन महिला आणि एका पुरुषाला विहिरीबाहेर काढले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेदरम्यान नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली.
नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड महापालिका अग्निशमन दल यांच्यावतीने बचाव कार्य सुरू असून विहिरीतील पाणी उपसा करून मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वसमत तालुक्यातील गुंज येथील दहा ते अकरा शेतमजुरांना एका ट्रॅक्टरमध्ये नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे भुईमूग निंदणीसाठी आणले जात होते. सकाळी सात वाजेदरम्यानच हे मजूर घराबाहेर पडले होते.
यात महिलांची संख्या जास्त होती. ज्या शेतातील भुईमूग निंदणीसाठी काम होते तेथे हे ट्रॅक्टर पोहोचले; मात्र ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने त्याच शेतातील विहिरीत हे ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळले.
जवळील काही शेतमजुरांनी विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुष मजुराला बाहेर काढले; मात्र इतर सात ते आठ जण अद्यापही विहिरीतच अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्याला वेग आला आहे. चार सक्षण पंपाच्या आधारे विहिरीतील पाणी उपसले जात आहे. पाणी उपसताच मजुरांना बाहेर काढण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.