बीड
Mocca on accused in Sarpanch Santosh Deshmukh murder case गेल्या एक महिन्यापासून गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन माहिती पुढे आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे.विशेष तपास पथकाने (एसआयटी) ने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक केली आहे.
पण त्यांच्यावर मोक्क अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. आता अखेर देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती एसआयटी पथकातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध नावं समोर येत असल्याने ही संघटीत गुन्हेगारी असल्याचं पोलिसांकडून कोर्टात सांगितलं जात होतं. टोळीच्या माध्यमातून बीडमध्ये गुन्हे केले जातायत, असं कोर्टात सांगितलं जात होतं. आता मोक्का कलम लावण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी ही कारवाई वाल्मिक कराडवर होणार नाही. कारण अद्याप वाल्मिक कराड याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलं नाही.
पोलिसांनी वाल्मिकला दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्याचं कनेक्शन बाहेर आल्यास वाल्मिकवर देखील ही कारवाई होऊ शकते. पण तूर्तास एसआयटीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.