परळी वैद्यनाथ
maha agri minister dhananjay munde agri exhibition राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रथमच परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव अंतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर भेट देऊन पाहणी केली.
कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन आधुनिक अवजारे यांसह विविध शेती उत्पादने आदींची शेकडो दालने (स्टॉल्स) उभारण्यात आली असून नॅनो खतांची ड्रोन द्वारे फवारणी करण्याची प्रात्यक्षिके सुद्धा येथे दाखवण्यात येत आहेत. या स्टॉल्सला भेटी देण्यामध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे हे तब्बल साडेतीन तास रमले होते. जवळपास 7.30 ते 11 वाजेपर्यंत या वेळेत त्यांनी जवळपास 335 स्टॉल्सला भेटी देऊन पाहणी केली व त्यांच्याकडील उत्पादनांची व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. चारही कृषी विद्यापीठाचे स्टॉल्स या ठिकाणी उभारले असून, तेथील उपक्रमांचीही मुंडेंनी माहिती घेतली.
या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी आणि शेतीमध्ये अधिक समृद्धी आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक बाबी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी व लाभ मिळवावा, असे आवाहन याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी केले आहे. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक श्री.मुळे, आत्माचे जिल्हा प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांसह अधिकाऱ्यांनी श्री मुंडे यांना माहिती दिली. प्रसंगी पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, त्यालाही शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. हा उपक्रम पुढील चारही दिवस अविरत सुरू राहणार आहे.
स्टॉल ठिकाणीच धनंजय मुंडे यांचा नाश्ता
काल सकाळपासूनच कार्यक्रमाची लगबग होती. सायंकाळी उशिरापर्यंत जेवणालाही वेळ मिळाला नाही, त्यामुळे सायंकाळी स्टॉल पाहत असतानाच धनंजय मुंडे यांनी स्टॉलवर असलेले विविध मिलेटपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, फळे यांचा शेतकऱ्यांच्या सोबत आस्वाद घेतला.