गौरव डेंगळे
new delhi
kho kho world cup 2025 nepal vs india खो खो विश्वचषक २०२५ मध्ये उद्घाटन सामना भारत विरुद्ध नेपाळ सामना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडला.खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली.
भारताचा पहिलाच सामना नेपाळशी रंगला होता.या सामन्यात भारताने पहिल्या डावातच मोठी आघाडी घेतली होती.भारताला अटॅक करण्याची संधी मिळाली होती.भारताने पहिल्या डावात २४ गुण मिळवले.त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा नेपाळ संघ अटॅक करण्यासाठी आला.
तेव्हा भारताने जबरदस्त पद्धतीने झुंजवलं. नेपाळने आपल्या डावात २० जणांना बाद करण्यात यश मिळवलं. पण भारताने ४ गुणांची आघाडी घेतली होती.
मात्र तिसऱ्या डावात बचावत्मक पवित्र्यात असलेल्या नेपाळने कमबॅक केलं. टीम इंडियाला फक्त १८ जणांना बाद करता आलं.तर नेपाळला चांगल्या डिफेंससाठी एक गुण मिळाला. तिसऱ्या डावानंतर भारताकडे २१ गुण होते. नेपाळला हा सामना जिंकायचा तर २२ जणांना बाद करणं आवश्यक होतं.
पण चौथ्या डावात टीम इंडियाचे खेळाडू भारी पडले. दुसऱ्या बॅचने नेपाळला चांगलंच झुंजवलं. त्यामुळे एकीकडे वेळ कापरासारखा उडत होता. दुसरीकडे नेपाळचे खेळाडू एक एक खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर नेपाळला फक्त १६ गुण मिळता आले.
एकूण भारताचे ४२ आणि नेपाळचे ३७ गुण होते.भारताने हा सामना पाच गुणांनी जिंकला.भारताच्या शिव पोथीर रेड्डी याला बेस्ट अटॅकिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. तर नेपाळच्या रोहितकुमार वर्माला सर्वोत्तम डिफेंसाठी सामन्यानंतर गौरविण्यात आलं आहे.
या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आदित्य गणपुले याने.. त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार होता. पण व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तान संघ भारतात पोहोचू शकला नाही. त्यामुळे भारताचा सामना नेपाळसोबत आयोजित केला गेला.
अ गटात नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान भारतासोबत असून प्रत्येकी एक सामना खेळतील. उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अव्वल दोन स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.