जालना
Jalna crime news सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्यानंतर काय घडू शकते याचे उदाहरण जालन्यात घडले. सुनेने सासूला मारून गोणीत ( बोरी ) भरले. या सासूची विल्हेवाट लावायची होती मात्र वजनदार गोणी सोडून पळून जावे लागले.
या सासूची हत्या करून फरार झालेल्या सुनेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलीय.
प्रतीक्षा शिंगारे हीने तिची सासू सविता शिंगारे (वय 45 वर्ष) हीची हत्या करून ती फरार झाली होती. प्रतीक्षा शिंगारे ही तिच्या सासूची हत्या करून परभणी येथे पळून गेल्याची खात्रीलायक माहिती जालना पोलिसांना मिळाली होती.
त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांच्या पथकाने सदरील आरोपी महिलेच्या परभणी येथे जाऊन मुसक्या आवळल्या आहेत.
सासू सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुनेनं सासूच डोकं भिंतीवर आपटून सासूची हत्या केली होती. त्यांनतर सासूचा मृतदेह एका बोरीत टाकून सदरील मृतदेह कुठे तरी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात प्रतीक्षा होती.
मात्र, जास्त वजनामुळे प्रतिक्षाला बोरी उचलता आली नाही. म्हणून ती सदरील मृतदेह तसाच बोरित सोडून घटनास्थळावरून पळून गेली.
प्रतीक्षा आणि तिची सासू सविता या दोन्ही जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात एका घरात किरायाने राहत होत्या.
काही दिवसांपूर्वी त्यांचं भांडण झालं होतं. आणि याच भांडणाचा राग मनात धरून प्रतीक्षा हीने तिच्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आणि ती परभणी कडे पळून गेली होती. पण जालना पोलिसांनी तिचा अवघ्या काही तासात शोध लावून तिला जेरबंद केलय. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.