केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर भेट येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत आज रात्री चर्चा; महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरात, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मराठवाड्याच्या ४८ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्ता बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
तसेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. बैठक स्थळी आगमनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत भाजपा शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
दिप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रुक्मिनी सभागृहात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, आ. पंकजाताई मुंडे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात महायुतीतील जागावाटपाच्या संदर्भात महायुतीतील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोघे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असुन आज नागपूर व छत्रपती संभाजीनगर व उद्या बुधवारी नाशिक आणि कोल्हापूर येथे पदाधिकारी संवाद मेळावा ते घेणार आहेत.