परळी वैजनाथ
Good news for parli vaidyanath sugar अनेक अडचणीवर मात करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या केवळ हितासाठी वैद्यनाथ कारखाना पुन्हा सुरू करतेयं याचा मला मनापासून आनंद होत आहे. वैद्यनाथच्या चिमणीतून धूर निघाला म्हणजे मुंडे साहेबांचं अस्तित्व जाणवतं अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा वैद्यनाथच्या चेअरमन आ. पंकजाताई मुंडे यांनी आज संवाद साधला.
येत्या २५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू होणार असून हा कारखाना कधीच बंद पडू देणार नाही याची जबाबदारी घेतो अशी ग्वाही ओंकार साखरचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि ओंकार साखर कारखाना प्रा.लि. (युनिट नं 8) यांच्या संयुक्त सहकार्याने कारखान्याचे रोलर पुजन आज मोठ्या उत्साहात पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या. कारखान्याचे संचालक, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैद्यनाथचे नाव घेतले तरी अंगावर शहारे उभे राहतात. हा कारखाना इथल्या शेतकऱ्यांची कामधेनु आहे. लोकनेते मुंडे साहेबांच्या पश्चात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत मी हा कारखाना चालवला. कारखाना अडचणीत असताना सरकारला मदत मागितली परंतु ती मिळाली नाही, इतर कारखान्यांना माञ मिळाली.
मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर दुष्काळ सुरू झाला, कोट्यवधी रुपये खर्च करुन कारखाना सुरू करणार होतो तोच गेल्या वर्षी कारखान्यावर जीएसटीची रेड पडली.
ज्यांचा कांही संबंध नाही तेही वसुलीसाठी येत होते. खूप अडचणीला तोंड द्यावे लागले. आता माञ वैद्यनाथला ओंकार स्वरूप प्राप्त झाले आहे. बोञे पाटलांनी राज्यातील अनेक कारखाने चालवायला घेतले आहेत आणि ते यशस्वीपणे चालवित आहेत.
मुंडे साहेबांचा हा कारखाना ते उत्तम रितीने चालवतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारखान्याच्या चिमणीतून धूर निघाला म्हणजे मुंडे साहेबांचे अस्तितत्व जाणवते असे त्या म्हणाल्या.मुंडे साहेबांचा सन्मान ठेवून हे युनिट चालवा असं मी बोञे पाटलांना सांगितले आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी जेणेकरून पुढील वर्षी मोठे गाळप होईल. कारखान्यामुळे व्यापार पेठेवरही परिणाम झाला होता पण आता सर्व कांही सुरळीत होईल. अतिशय शिस्तीत आणि प्रोफेशनली हा कारखाना चालणार आहे यात कुणीही डिस्टर्ब करु नये असं आ. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.
Good news for parli vaidyanath sugar २५ नोव्हेंबरपासुन गाळप सुरू
याप्रसंगी बोलताना ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञेपाटील म्हणाले की, कारखाना सुरू होण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे हा कारखाना मला चालवण्यासाठी मिळाला आहे. ओंकार समुहाच्या वतीने महाराष्ट्रात ७० लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे वैशिष्टये ठेवले आहे. हा कारखाना आम्ही शिस्तीत चालवणार आहोत.
वेळच्या वेळी शेतकरी, कर्मचाऱ्यांचे पेमेंट होतील असे सांगुन येत्या २५ नोव्हेंबरपासुन कारखान्याचे गाळप सुरू होईल आणि आपला उच्चांकी बाजारभाव राहील असे सांगताच उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यापुढे कारखाना कधीच बंद पडणार नाही याची मी जबाबदारी घेतो असेही बोञे पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव गुट्टे यांनी तर संचलन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले. ओंकारचे जनरल मॅनेजर गिरीश लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी वैद्यनाथचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, रमेश कराड, संचालक अजय मुंडे, पांडूरंग फड, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, केशव माळी, राजेश गित्ते, माऊली मुंडे, संजय आघाव. सुरेश माने, शिवाजीराव मोरे, हरीभाऊ गुट्टे, माणिक फड, वसंत राठोड, सचिन दरक, रेशिमनाना कावळे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.