आष्टी
Dasara Melava Beed with Dhananjay Munde पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदा या दसरा मेळाव्याचे विशेष आहे ते यासाठीच की, गेल्या अनेक वर्षापासून भगवान भक्ती गडावर कृषी मंत्री धनंजय मुंडे हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याकडे सर्वच राजकीय धुरीनांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे दिवंगत मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची प्रथा सुरू केली. प्रारंभी हा दसरा मेळावा बीड जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्हींच्या सीमारेषेवर असलेल्या भगवानगडावर होत असे. दरम्यानच्या काळात कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर या भगवानगडावरील दसरा मेळाव्याला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावायला सुरुवात केली. राजकारणाची आणि समाजकारणाची किनार असलेल्या या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्याला राज्यातून आणि परराज्यातून मुंडे कुटुंबीयांवर प्रेम करणारे आणि भगवान बाबांना मानणारे भाविक भक्तगण या ठिकाणी येत असतात.
कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्यात मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दुही निर्माण झाली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपला स्वतंत्र दसरा मेळावा संत भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव भगवान भक्ती गड येथे सुरू केला. त्यानंतर यंदा प्रथमच धनंजय मुंडे या भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावणार आहेत.
यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः आपल्या एक्स अकाउंट च्या माध्यमातून दिली आहे. तसेच राज्यातील भगवान बाबा भक्तांना या भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये दोघे बहिण भाऊ काय समाज बांधवांना संदेश देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दसरा मेळावा हा जसा सामाजिक एकत्रीकरणाचा महत्त्वाचा प्रसंग असला तरी या माध्यमातून राजकारणाची गणिते ठरवली जातात. गेल्या अनेक वर्षापासून अहिल्यानगर आणि बीड या दोन्ही जिल्ह्यातील वंजारी समाज यांच्या एक गठ्ठा मतदानावर अनेकांची राजकीय भवितव्य ठरली जातात. यामध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ, बीड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात या मेळाव्यातून ओबीसी बांधवांना हाक देण्याचा प्रयत्नही होऊ शकतो.