कडा
Cheating in exam for 12th इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी कडा परिरक्षक केंद्र अंतर्गत येणाऱ्या दोन बारावी परीक्षा केंद्रावर चार विद्यार्थी कॉपी करताना भरारी पथकाला आढळून आले. या विद्यार्थ्यांवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरप्रकार कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत आज पासून प्रारंभ झाला. यंदा या बोर्ड परीक्षेत कॉपी होणार नाही यासाठी शालेय शिक्षण विभाग यांच्यासह महसूल प्रशासन आणि पोलीस यांची मदत घेतली जात आहे.
यासाठी प्रत्येक केंद्रावर भेट देण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये शिक्षण विभागातील विविध दर्जाचे अधिकारी यांचा समावेश आहे.
आष्टी तालुक्यातील कडा परिरक्षक केंद्र अंतर्गत इयत्ता बारावीचे सात परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रावर सत्तावीसशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आज या विविध परीक्षा केंद्रांना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.
यामध्ये पुणे येथील शिक्षण कार्यालयाचे शिक्षण सहसंचालक डॉ श्रीराम पानझाडे पुणे यांनी विविध केंद्रांना भेट दिली.
त्यांच्यासोबत बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस, सोनवणे सर हे होते. यामध्ये त्यांना धानोरा येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात तीन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.
तर मोतीलाल कोठारी ज्युनिअर कॉलेज या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला. या चारही विद्यार्थ्यांवर गैरमार्ग नियमानुसार कारवाई करण्यात आली असल्याचे कडा चे परिरक्षक प्रकाश सातपुते यांनी सांगितले.