Beed santosh deshmukh SIT केज येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तयार करण्यात आलेली एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक यामध्ये सुधारणा करण्यात आली असून नऊ सदस्य तपास पथकाच्या ऐवजी आता सहा सदस्य या तपास पथकात असणार आहेत.
यापूर्वीच्या तपास पथकामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण बीड आणि केज पोलीस स्टेशन मधील अधिकारी हवालदार यांचा समावेश होता. आता हे तपास पथक बदलण्यात आल्याचे गृह विभागाच्या शुद्धिपत्रकात म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दीड महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास योग्य होत नसल्याचे देशमुख कुटुंबाचे आरोप होते.तसेच या विशेष तपास पथकावर सामाजिक कार्यकर्त्यांसह आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.त्यामुळे या एस आय टी मध्ये बदल करण्यात आला आहे.
पोलीस महासंचालक तसेच अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या शिफारशीनुसार यापूर्वीच्या तपास पथकामध्ये असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार वगळण्यात आले असून त्यामध्ये बीड जिल्हा पोलीसचा एकही अंमलदार किंवा अधिकारी घेण्यात आला नाही.
नव्याने तयार झालेल्या विशेष तपास पथकात श्रीमती किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजी नगर, अनिल गुजर पोलीस उपाधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड, सुभाष मोठे पोलीस निरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड, अक्षय कुमार ठिकणे पोलीस निरीक्षक भरारी पथक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, शर्मिला साळुंखे पोलीस हवालदार भरारी पथक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, दिपाली पवार पोलीस हवालदार सीसीटीएनएस पुणे या सहा जणांचा समावेश या नवीन विशेष तपास पथकात करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या होऊन दीड महिना उलटला आहे. या संदर्भात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार यांनी या एसआयटी संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा गुन्हा घडला त्याच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचा या एसआयटीमध्ये समावेश होता. त्यामुळे या एसआयटी संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आताही शासनाने या एसटीची रचना बदलली असून नऊ ऐवजी सहा अधिकाऱ्यांची ही एसआयटी असणार आहे.