बीड
beed extortion and sarpanch murder case cid prob खंडणीच्या गुन्हा प्रकरणी वाल्मीक कराड यांच्या पत्नी, दोन अंगरक्षक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण अशा चौघा जणांना शुक्रवारी रात्री बीड शहरातील शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सीआयडीच्या पथकाने चौकशीसाठी बोलावले. दरम्यान शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष दक्षता बाळगण्यात आली होती व बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.
सीआयडी चे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये शुक्रवारी दाखल झाले. या अप्पर पोलीस महा संचालक. सी आय डी प्रशांत बुर्डे , सीआयडी एस. पी. सतीश पाटील यांचा समावेश आहे. केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार आहेत. तसेच आत्तापर्यंतच्या तपासाची पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून माहिती घेतली आहे.
रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील पोलीस स्टेशन येथे सीआयडी चे पथक व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाल्मीक कराड यांच्या पत्नी, त्यांचे दोन अंगरक्षक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण अशा चौघांना चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल 40 ते 45 मिनिटे अशी चौकशी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान पोलीस स्टेशन परिसरामध्ये पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांकडून देखील विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनचे प्रमुख व अन्य अधिकाऱ्यांनी देखील हा तपासाचा भाग सीआयडी चे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या असल्यामुळे यात आम्ही माहिती देऊ शकत नसल्याचे ही स्पष्ट केले.