बीड
beed dhondrai mgnrega currption धोंडराई तालुका गेवराई येथील तीनशे गायगोठे आणि चारशे विहिरीसह इतर कामातील भ्रष्टाचार आणि गैरकारभार जनआंदोलनाने उघडकीस आणला. त्याला लागून गेवराईतील अन्य अनेक गावातील घोटाळे देखील समोर आले. यावर आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि अँड. अजित देशमुख यांची बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब लक्षात घेतली. गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तीन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करा अन्यथा ग्रामपंचायतचे खाते होल्ड करू, असे आदेश निर्गमित केले. हे आदेश फक्त धोंडराई पुरते मर्यादित नसून गेवराई तालुक्यातील सर्व गावांसाठी आहेत, अशी माहिती जन आंदोलनाची विश्वस्त अँड.अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभाची जेवढी कामे आहेत, त्याचे कुशल आणि अकुशल असे दोन्ही प्रकारचे देयके लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आहेत. मात्र असे होत नव्हते. त्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यानंतर जन आंदोलनाने ही बाब सातत्याने लाऊन धरली.
आज या मुद्द्यावर बैठक झाली. या बैठकीमध्ये कठोर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे आवश्यक आहे. गेवराई तालुक्यात धोंडराईसह अन्य अनेक गावांमध्ये हा प्रकार घडलेला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांवर टांगती तलवार आहे.
मनरेगाचे पैसे आयुक्तांकडून मागवतानाच ते ग्रामपंचायतच्या खात्यातुन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक असते. मात्र तसे न करता हे पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यात मागवण्यात आलेले आहेत. ग्राम पंचायतनेच हे पैसे उचचले आहेत. लाभार्थ्यांचे व्हेंडर तयार केलेच नाहीत. नियमाने हे तयार व्ह्यायला पाहिजे होते.
तालुक्यात आता अनेक ठिकाणी पळवटा शोधण्याची काम चालू होईल. मात्र संपूर्ण कागदपत्र तयार आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी आणि संबंधित यंत्रणेने कुठलीही बनवाबनवी करू नये. अन्यथा त्यांना महागात पडेल. लाभार्थ्यांनी देखील पैसे मिळाले असे लिहून देऊ नये. कारण काम झालेले नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. आपले पूर्ण पैसे घ्यावेत, अन् काम देखील व्हावे,. यातच लाभार्थ्यांचे हित आहे. लिहून देवून आजचा ग्राम पंचायतीची प्रश्न सुटेल. पण कामाची तपासणी झाली तर सुट्टी नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे .
दरम्यान एका गावाचे उदाहरण समोर आणत आपण तालुक्यातील कारभार समोर आणला आहे. असाच कारभार जिल्ह्यात असल्याने जिल्ह्याला वळण लावण्याचे काम धोंडराईच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या चौकशीत समोर आलेल्या गावात कुठलीही कसूर केली जाणार नाही. योग्य निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे.
या सर्व प्रकारांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जर झालेल्या चुका झाकण्याचा प्रयत्न झाला, तर गटविकास अधिकाऱ्यांनी डोळे झाकून कारभार केला का ? हा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे त्यांनी कडक भूमिका न घेतल्यास त्यांच्या विरोधात आम्हाला शासनाकडे दाद मागावी लागेल. त्यामुळे त्यांनी आता बघ्याची भूमिका घेऊ नये.
आता वैयक्तिक लाभार्थ्यांनी लाभाची संपूर्ण रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याशिवाय बोगस पद्धतीने काहीही लिहून देऊ नये. अन्यथा ते देखील घोटाळे सापडतील. लाभार्थ्यांना पूर्ण लाभ मिळावा हाच जन आंदोलनाचा उद्देश आहे. त्यामुळे दलाली आणि लाच या स्वरूपात गेलेले पैसे देखील लाभार्थ्यांनी आपल्या खात्यातून वळती करून संबंधितांना देऊ नयेत, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.