कोणता झेंडा घेऊ हाती? धस, धोंडे समोर प्रश्न
आष्टी
Ashti assembly elections आष्टी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यासमोर सध्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची यासंदर्भात प्रश्नचिन्ह आहे.
या दोन्हीही माजी आमदारांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. मात्र ही जागा कोणाच्या वाट्याला जाते त्यावरून या दोन्ही माजी आमदारांचे पक्ष ठरणार आहेत.
राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची युती आहे. या महायुतीने काही दिवसापूर्वी राज्यातील विधानसभा मतदारसंघातील पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये बीड जिल्ह्यातील फक्त एका म्हणजे केज मतदार संघाचा समावेश होता.
आष्टी मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बाळासाहेब आजबे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
बाळासाहेब आजबे यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे माजी आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जागा भाजपाला सोडावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महासचिव पंकजा मुंडे यांच्यामार्फत अजित पवार यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याला किती यश येते त्यावरच या दोन्ही माजी आमदारातील उमेदवारीचा प्रश्न सुटणार आहे.
या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होणे अजून बाकी आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार सुरेश धस, आणि माजी आमदार साहेबराव दरेकर ही ही निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र ही जागा महायुतीच्या कोणत्या पक्षाला मिळते त्यावरून महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असणार हे ठरणार आहे.
ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडेच राहिली तर भाजपच्या दोन्ही माजी आमदारांना कोणाचा झेंडा घ्यायचा की अपक्ष लढवायचे हा प्रश्न समोर निर्माण होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी कोणाचा झेंडा घेऊ हाती अशी म्हणण्याची वेळ या दोन्ही आमदारावर सध्या तरी दिसत आहे.