विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -
- Advertisement -

सोलापूर,

Ashadhi ekadashi pandharpur darshan राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केलेले होते. येथे वारकरी, शेतकरी व कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे व हे शासन ही त्यांचेच आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळीसार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, नगरविकाचे उपसचिव तथा समन्वयक अनिरुद्ध जवळेकर, आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

       मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भावी येतात व दर्शन रांगेत 18  तास उभे राहतात अशा भाविकांना दर्शनाला प्राधान्य मिळाले पाहिजे या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत शासन प्रशासनाच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंढरपूर मध्ये येत असताना रस्त्याने देखील  वारकऱ्यांच्या सगळीकडे दिंड्या पालख्या येत होत्या व एक भक्तीमय वातावरण होते. पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील सर्व रस्ते स्वच्छ होते. परंतु प्रशासनाने चेंजिंग रूम ची संख्या वाढवावी तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूला कचराकुंड्याची संख्या वाढवावी, आवश्यक मनुष्यबळ वाढवावे व संपूर्ण चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. पंढरपूर शहरातील एकाही पोलवर कोणाचेही कट आउट लावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी व रस्ते मोकळे ठेवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

      पंढरपूर येथे येणाऱ्या 15 लाख वारकरी व भाविकांना मोफत पाण्याच्या बॉटल व मँगो ज्यूस देण्यात येणार आहे. हे वाटप करत असताना स्टॉलची संख्या वाढवावी व या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सर्व भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल व सर्व ठिकाणी स्वच्छता राहील याबाबत अधिक जागरुक राहावे. शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचे मुख्यालय पंढरपूर येथेच राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देऊन पंढरपूर शहराचा  सर्वंकश विकास आराखडा त्वरित सादर करावा. तसेच राज्य शासनाने वारकरी यांच्या प्रत्येक दिंडी 20 हजार रुपये जाहीर केलेले होते ते संबंधित दिंडी च्या बँक खात्यावर वितरीत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

       पंढरपूर शहरात महत्त्वाच्या चार वाऱ्या असतात. या कालावधीत लाखो नागरिक येथे येतात. तसेच प्रतिमहा हजारो नागरिक येथे दर्शनासाठी येतात, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने 1 हजार बेडच्या नवीन रुग्णालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव आरोग्य विभागाने तात्काळ सादर करावा, त्यासाठी आवश्यक असलेला निधीही उपलब्ध करून देण्यात येईल. त्याप्रमाणेच नियोजित स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी प्रशासनाने सादर केलेल्या 100 कोटीच्या प्रस्तावात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र सोय करून तिरुपतीच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सुचित केले.

     आषाढी एकादशी साठी पोलीस विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी व भाविकांना आपल्या वाहनाच्या ताफ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच वारी कालावधीत हजारो पोलीस कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था योग्य प्रकारे व्हावी याकरिता आवश्यक असलेला निधी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याबाबत शासन विचार करत आहे.  पंढरपूर येथील आषाढी कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र निधी या पुढील काळात देण्याबाबत शासन सकारात्मक आहे त्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

      ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्यासाठी जे साऊंड सिस्टिम निर्माण केली आहे त्याच्यावर भजन पूर्ण वारी कालावधीत व्यवस्थितपणे सुरू राहिले पाहिजे याची दक्षता प्रशासनांनी घ्यावी तसेच ग्राम विकास विभागाकडील वारीच्या अनुषंगाने देण्यात येणारा निधी हस्तांतरित केल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आषाढी वारी संपल्यानंतर स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण शहर तीन ते चार दिवसात स्वच्छ होईल यासाठी नियोजन करावे तसेच आषाढी दिवशी वाहतूक नियंत्रण योग्य राहील याची दक्षता घ्यावी त्याप्रमाणेच पंढरपूर शहरात नवीन 1000 बेड साठी आवश्यक असलेला निधी आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल  त्याचप्रमाणे वारी कालावधीत  पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था भेरवनाथ शुगरच्या सीएसआर फंडातून करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

  सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भुसे यांनी 65 एकरवर येणाऱ्या दिंड्याच्या सोयीसुविधासाठी एक चांगला विकास आराखडा तयार करून शासनाला सादर करावा. वारकरी मंडळ पंढरपूर येथेच होणार आहे त्यासाठी जागा उपलब्ध करून ठेवावी तसेच शहरात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे अशा सूचना केल्या. यावेळी विभागीय आयुक्त यांनीही ज्या दिंड्यांची नोंदणी झालेली आहे त्या दिंड्यांना शासनाने जाहीर केलेले वीस हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कायदा व सुव्यवस्था बाबत माहिती देऊन आषाढीच्या दिवशी वाहतुकीचे अत्यंत कटाक्षाने नियोजन करण्यात येईल असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची माहिती सांगितली

     प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधा विषयी माहिती दिली. तसेच वारी कालावधीत कोणत्याही भाविकाला सुविधा अपुऱ्या पडणार नाहीत त्याची काळजी प्रशासन घेत असल्याचे सांगितले. तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय व मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सुविधांमध्ये आणखी वाढ करून घेण्यात येईल असे सांगितले. तसेच स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी प्रशासन प्रस्ताव तयार करत असून तो तिरुपतीच्या धर्तीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles