अंबाजोगाई
ambajogai news महाराष्ट्राच्या राजकीय, वैचारिक समृद्धीसाठी यशवंतराव चव्हाण यांनी अलौकिक कार्य केले असल्याचे मत अंमळनेर येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केले.
येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ३९ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपीय भाषणात अंमळनेर येथील नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा . डॉ. रविंद्र शोभणे हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पुरस्कारर्थीं नारायणराव गोरे, प्रा. ललिता गादगे, पं. विजय देशमुख आणि अविनाश मुकुंद साबळे हे चार पुरस्कार मुर्ती, यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात प्रा. डॉ . रविंद्र शोभणे बोलतांना पुढे म्हणाले की, २०१० समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अंबाजोगाई येथे आलो होतो आता २०२३ ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर अंबाजोगाईत आलो आहे. अंबाजोगाई शहर हे बिना पुतळ्याचा शहर म्हणून अभिमान आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,
महाराष्ट्राच्या वैचारिक, राजकीय समृद्धीसाठी केलेले दिशादर्शक काम अलौकिक आहे. यशवंतराव चव्हाण यांनी हा महाराष्ट्र हा लेखक, कलावंत, विचारवंत, कामगार, कष्टकरी, शिक्षणाचा, लोकांचा आहे असा बनवला आहे. केवळ मराठी भाषा बोलणा-यांचाच महाराष्ट्र असावा अशी भुमिका यशवंतराव चव्हाण यांची होती. मात्र तत्कालीन राजकीय परिस्थितीत त्यांना ही भुमिका तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कडे मांडली होती. या घटनांच्या मागील यशवंतराव चव्हाण यांची मोठी कल्पकता होती.
आज यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या राजकीय आणि सामाजिक विचारात अंतर पडत चालले असल्याची खंत व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण यांचे दिल्लीच्या राजकारणात उत्तर भारतातील लोकांना पसंद नव्हते तरीही यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकुशल शैलीच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपले स्थान अढळ ठेवले. यशवंतराव चव्हाण यांना राजकीय, सामाजिक दुरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेले विचार सामाजिक, राजकीय, साहित्य क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांनी आज कायम ठेवले आहेत का? यांचा विचार केला तर आपल्या पदरी निराशाच येते असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांनी आपल्या विस्तारीत भाषणात यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील अनेक गोष्टींचा विस्ताराने उल्लेख केला. आज राज्यात मराठी माध्यमांच्या १६,५०० शाळा बंद पडल्या आहेत, ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या विरोधात आहे. मराठी माध्यमांच्या शाळा या वाचवल्या गेल्या पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने भारावून गेलेल्या पिढीने यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत सलग ४० वर्ष चालू ठेवलेल्या दगडू लोमटे आणि त्यांच्या सर्व सहका-यांचे कौतुक केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने भारावून गेलेल्या पिढीने यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत सलग ४० वर्ष चालू ठेवलेल्या दगडू लोमटे आणि त्यांच्या सर्व सहका-यांचे कौतुक केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचीव दगडू लोमटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक त्यांनी या समारोहाची सुरवात ३८ वर्षापुर्वी या समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.श्री. भगवानरावजी लोमटे उर्फ बापू, भगवानराव शिंदे व त्यांच्या सहका-यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी केली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या निर्मिती साठी यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणाऱ्या साहित्य, कला-संगीत, कृषी आणि युवा शक्ती यांची सांगड घालत यासर्व बाबींची माहिती या तीन दिवसीय यशवंराव चव्हाण स्मृती समारोहात देण्यात येते. या पुर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक मान्यवर विचारवंतांनी आपली हजरी लावली असून आज या समारोहाचा समारोप ज्येष्ठ लेखक तथा अंमळनेर येथील अखील भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ . रविंद्र शोभणे यांच्या हस्ते होत आहे याचा आपणास मनस्वी आनंद होतो आहे, आणि या सोहळ्यास सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी व मराठवाड्यातील, शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये नारायणराव गोरे (कळमनुरी) जि. परभणी यांना कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल उद्योजक (फळ उत्पादक) यांना “कृषी” पुरस्कार देऊन, अहमदपूर जि. लातुर येथील ज्येष्ठ लेखिका प्रा. सौ. ललिता गादगे यांना “साहित्य” क्षेत्रातील, माजलगाव जि. बीड येथील पं. विजय देशमुख यांना “संगीत” क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तर युवा खेळाडू व (धावपटू) या स्पर्धेत भारतात विक्रम प्रस्थापित करणाऱ्या आष्टी (बीड) येथील अविनाश साबळे यांना क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “युवा गौरव” सन्मान प्रदान करण्यात आला.
अविनाश साबळे यांचा पुरस्कार त्यांचे वडील मुकंदनाना साबळे यांनी स्विकारला.
या चार ही मान्यवरांचा प्रत्येकी स्मृतीचिन्ह, रोख पाच हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. यावेळी नारायणराव गोरे, प्रा. सौ. ललिता गादगे, पं. विजय देशमुख यांनी आपल्या सत्काराबध्दल ऋण व्यक्त करणारे मनोगत ही व्यक्त केले.
कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आलेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल समारोहाचे सचिव दगडू लोमटे, भगवानराव शिंदे, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, सतिष लोमटे, राजपाल लोमटे यांनी रसिक श्रोत्यांचे आभार मानले आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सतिष लोमटे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांचा परिचय समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन प्रा. मेघराज पवळे यांनी व आभार प्रा. भगवान शिंदे यांनी मानले. तर पुरस्कारर्थीं मान्यवरांचा परिचय प्रा. डॉ. सौ. मिसाळ यांनी करुन दिला.