अंबाजोगाई
ambajogai news भास्कर चंदनशिव यांच्या व्यक्तिमत्त्वावर अंबाजोगाईच्या संस्कारांचा प्रभाव आहे. त्यांचे लोमटे बापू आणि अंबाजोगाईवर नितांत प्रेम आहे. म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते, ओव्या हे ज्ञान संक्रमणाचे शास्त्र आहे. यातून तत्कालीन कृषि समाजाने संदेश दिलेला आढळतो. मराठी साहित्य गावखेड्यात नेण्याचे काम चंदनशिव यांनी केले.
त्यांच्या साहित्यात बोलीभाषेचा सहज व विपुल वापर आढळतो. त्यामुळे ते संपूर्ण गावगाड्याचे लेखक आहेत. मापदंड आहेत. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारी, चंदनशिव यांची कथा आहे. त्यांच्या कथेने वाचकांना नवी दृष्टी दिली.
गावगाडा, कृषिजन कवेत घेवून नैतिकता जोपासली, चंदनशिव यांनी आयुष्यात कुठलीच तडजोड न करता, प्रसिद्धीसाठी मुंबई, पुणे याला प्राधान्य न देता कळंब येथे राहून नव्या पिढीला बाणेदारपणा शिकवला, मराठी साहित्यात चंदनशिव यांचा आदरयुक्त धाक आहे. असे गौरवोद्गार काढून प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस यांनी व्यक्त केली.
दसऱ्यापूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार सर्वात मोठी भेट PM kisan
लेखक होणे कठीण पण, मिरवणे सोपे असते. साहित्य निर्मिती ही आतून व्हावी लागते, कारण, लिहिणे हे तलवारीवर चालण्यासारखे असते, सध्याचा काळ हा संभ्रमातून सुमारांची सद्दी निर्माण करणारा आहे, चांगल्या लोकांची समाजाच्या सर्वक्षेत्रांत वाणवा असल्याची खंतही प्रा.गवस यांनी व्यक्त केली.
या वर्षीचा ११ वा पुरस्कार ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांना प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस (कोल्हापूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम २५ हजार रूपये असे आहे.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व.भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक, गावगाड्याचे कथाकार, कादंबरीकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत लिखाण करणारे प्रा.भास्कर चंदनशिव (कळंब) यांना रविवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथे आयोजित एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.भास्कर चंदनशिव म्हणाले की, माझा व स्व.भगवानराव लोमटे बापू यांचा कौटुंबिक स्नेहबंध होता. बापूंचा सहवास तसेच अंबाजोगाईचे संस्कार, संस्कृती, भाषा यामुळे माझी जडण-घडण झाली. त्या काळात बापूंचा ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना कायम आधार, स्नेह व सहकार्य लाभले. बापूंच्या अंगी उपजत नेतृत्वगुण होते.
त्यांनी अंबाजोगाईचे संस्कार, संस्कृती, इतिहास सांभाळण्याचे काम केले. आजचा काळ हा संभ्रमाचा, गावाचे गावपण नासवणारा आहे. राजकारणाला ओंगाळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. समाजात वृध्दाश्रम असू नयेत, मानवी नातेसंबंध संपुष्टात येत आहेत. अर्थकारणाला बळकटी देणारा पोशिंदा शेतकरीच आज आत्महत्या करीत आहे.
साहित्य हे मुल्य राखण्याचे काम करते. आज भूमिका असणारे लेखक हवे आहेत. संभ्रमाचा काळ दुर होवून माणसे माणसांत यावीत अशी अपेक्षा व्यक्त करून बापूंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल प्रा.भास्कर चंदनशिव यांनी स्मृती समितीचे आभार मानले.
सुरूवातीला प्रास्ताविक करताना यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी अंबाजोगाई येथील राजकारणी समाजकारण, साहित्य, संस्कृती, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले आहे असे श्रध्देय स्व.भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यपातळीवर उल्लेखनीय कार्य केलेल्या एका मान्यवरास हा पुरस्कार स्वर्गीय भगवानराव लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो.
या वर्षीचा ११ वा पुरस्कार ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांना प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस (कोल्हापूर) यांच्या हस्ते प्रदान करीत आहोत. त्यांनी चंदनशिव, गवस यांच्याविषयी माहिती दिली. शेतकरी नेते स्व.शरद जोशी यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढली.
दरवर्षी पुरस्कार प्रदान समारंभास अंबाजोगाई शहर व तालुक्यातील रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती असते. स्मृती समिती सातत्याने विधायक उपक्रम राबविते अशी माहिती ही सचिव दगडू लोमटे यांनी दिली.वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबाजोगाईच्या भव्य प्रांगणात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर सत्कारमूर्ती ज्येष्ठ कथा व कादंबरीकार प्रा.भास्कर चंदनशिव (कळंब), प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस (कोल्हापूर), यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष डॉ.कमलाकर कांबळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ आणि स्व.भगवानरावजी बापू लोमटे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विश्वजीत धाट व संचाने स्वागतगीत सादर केले. स्मृती समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे समितीचे कोषाध्यक्ष सतिश लोमटे यांच्या हस्ते आदरपूर्वक स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी करून दिला. तर प्रख्यात लेखक बालाजी सुतार यांनी लिहिलेल्या सन्मानपत्राचे वाचन अभिकथाकार विवेक गंगणे यांनी केले.
यावेळी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रा.मेघराज पवळे यांनी मानले. या कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र जगताप (बीड), माजी आमदार पृथ्विराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉ.नरेंद्र काळे,
भगवानराव बप्पा शिंदे, राजपाल लोमटे, अच्युत गंगणे, कालिदास आपेट, पं. उध्दवबापू आपेगावकर, अनिकेत लोहिया, प्राचार्य डॉ.बाळासाहेब चव्हाण, वसंतराव मोरे, दाजीसाहेब लोमटे, डॉ.मुकूंद राजपंखे, विश्वांभर वराट, विद्याधर पांडे, एस.बी.सय्यद तसेच ज्येष्ठ नागरीक, महिला, युवक यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर उपस्थित होते.