ठाणे
बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज तळोजा कारागृहातून चौकशीकरिता ठाण्यात नेले जात असताना, मुंब्रा बायपास येथे त्याने अचानक एका पोलिस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्वर हिसकावून त्याच्यावर गोळीबार केला. शिंदे याने बंदुकीतून तीन राउंड फायर केले. यावेळी अन्य एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षार्थ शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. यातच गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
शिंदे याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. याखेरीज त्याच्या दोन पत्नींनी शिंदे याने त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या पत्नीने केलेल्या याच आरोपाची चौकशी करण्याकरिता आज सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झीट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना त्याने पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये मोरे यांच्या पोटाला व मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला. त्याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी वरील माहितीस दुजोरा दिला.