मुंबई
Acharya Balshastri Jambhekar Welfare Corporation’ fast to death for formation महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या आणि माध्यमकर्मींच्या हक्कांसाठी आर्थिक, सामाजिक, मानसिक हितासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर कल्याणकारी महामंडळ’ म्हणजेच वेल्फेअर बोर्ड गठीत व्हावं, यासाठी मिडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) संस्थापक अध्यक्ष पत्रकार शीतल करदेकर यांनी आझाद मैदान इथं आजपासून आमरण उपोषण सुरू केलं. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १० वर्षांपासून शीतल करदेकर यांचा लढा सुरू आहे. आजपासून शीतल करदेकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी आणि माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण शीतल करदेकर आपल्या मागण्यांवर ठाम राहत जोपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट होत नाही आणि अधिवेशनात वेलफेअर बोर्डाची घोषणा होत नाही, महामंडळासाठी १.५ ची आर्थिक तरतूद करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असं सांगितलं.
मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी आणि माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांनी अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून शीतल करदेकर यांच्याशी बोलणं करून दिलं. यावेळी शीतल करदेकर दूरध्वनीवर म्हणाल्या की ‘दादा आपण भेटत नाही म्हणून आपली बहीण उपोषणाला बसली आहे.जोपर्यंत आपली भेट होऊन आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार. ‘ मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी बैठक लावण्याचं आश्वासन दिलं. मात्र उपोषणावर ठाम असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाल्यावरच उपोषण सोडणार असल्याचं शीतल करदेकर यांनी स्पष्ट सांगितलं.
यावेळी आझाद मैदानावर मिडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत, मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस, सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर,संस्थापक सदस्य शेखर धोंगडे,डाॅ.अब्दुल कादिर, लक्ष्मिकांत घोणसे पाटील, सुनील कटेकर,प्रवीण वाघमारे, पराग सारंग,भुपेश कुंभार,भूषण मांजरेकर,विवेक कांबळे, चंद्रशेखर पाटील,दीपक चिंदरकर, गणेश तळेकर आदी सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.