शाहिरी महोत्सवाच्या रूपाने कलावंतांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध. :- मा. आ. लहू कानडे.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
Shahiri Mahotsav ahilyanagar राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असणाऱ्या शाहिरांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शाहिरी महोत्सवाच्या रूपाने हक्काचे विचारपीठ उपलब्ध झाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, कवी, विचारवंत व श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात आयोजित शाहिरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी, अभिनेत्री आरती काळे नगरकर, लोककला अभ्यासक भगवान राऊत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आदी मान्यवर यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार लहू कानडे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शाहिरी महोत्सव आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात होतो. याचा आम्हा लेखक, साहित्यिक, कलावंतांना आनंदच आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला लोककलेची मोठी परंपरा आहे. या जिल्ह्याने राज्याला अनेक उत्तम तमाशा कलावंत, वगनाट्य लेखक, शाहीर, गायक, लावणी कलावंत दिले. शाहीर होनाजी बाळा, शाहीर पठ्ठे बापूराव यांच्यापासून सुरू झालेली ही शाहिरी परंपरा पुढे शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पुढे नेली. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठे योगदान दिले. तीच परंपरा पुढे नेण्याचे काम अहिल्यानगर जिल्ह्यातील शाहीर विजय तनपुरे, शाहीर कल्याण काळे, शाहीर शिवाजी शिंदे, शाहीर भारत गाडेकर यांच्यासारखे अनेक शाहीर करीत आहेत.
लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर म्हणाल्या की, शाहिरी महोत्सव, तमाशा महोत्सव, लावणी महोत्सव यासारख्या विविध उपक्रमातून महाराष्ट्रातून अनेक कलावंत घडावेत आणि महाराष्ट्रातील उपेक्षित कलावंतांची सांस्कृतिक कार्य संचालनालयाने योग्य वेळी योग्य दखल घ्यावी. हा शाहिरी महोत्सव अहिल्या नगर शहरात आयोजित केल्याबद्दल शासनाला धन्यवाद देत त्यांनी या शाहिरी महोत्सवाला शुभेच्छा देत शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.
यावेळी कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ यांनी उपस्थित मान्यवरांचा महापुरुषांचे चरित्र ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून व दीप प्रज्वलन करून या शाहिरी महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले.
उद्घाटनानंतर शाहीर शिवाजी शिंदे (अहिल्यानगर), शाहीर विजय पांडे (अकोला) व शाहीर तुकाराम ठोंबरे (बीड) आणि सहकाऱ्यांचे शाहिरी पोवाड्यांचे सादरीकरण झाले. कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले.