दोन दिवसीय अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचा समारोप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई (प्रतिनिधी)


Elgar Marathi Gazal Sammelan ambajogai गझल ही जीवन कसे जगावे हे शिकवते असे मत ज्येष्ठ उर्दू व मराठी गझलकार डॉ. गणेश गायकवाड यांनी दोन दिवसीय अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचा समारोप करताना व्यक्त केले.


आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारोपीय सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेसाहेब देशमुख तर अध्यक्ष म्हणून संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे हे उपस्थित होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष दगडू लोमटे, डॉ. शुभदा लोहिया, गोरख शेंद्रे, सुनील जाधव हे उपस्थित होते.


आपल्या विस्तारीत भाषणात डॉ. गणेश गायकवाड यांनी मराठी उर्दू गझलांचे संदर्भ देत महाराष्ट्रात गझल ही कशी समृध्द होत गेली ते सांगितले.

गझलेची सुरुवात ही उर्दू भाषेत झालेली असली तरी आता मराठी गझल ही खुप आशयघन झाली असून उर्दू गझलापेक्षाही ती खुप पुढे गेली असल्याचे सांगितले.
गझल लेखन करण्यापुर्वी गझलकारांनी जुन्या उर्दू आणि मराठी गझलकारांनी लिहिलेल्या गझलांचा अभ्यास करणे हे खुप आवश्यक असल्याचे सांगत गझलेला आशयघन आणि समृध्द बनवण्यासाठी गझलेतील प्रत्त्येक शेर हा ताकदवान झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.


आपल्या भाषणात डॉ. गणेश गायकवाड यांनी आपला मराठी आणि उर्दू गझलांचा प्रवास कसा सुखकर झाला, उर्दू गझला लिहिण्यापुर्वी आपण उर्दू भाषा कशी आत्मसात केली हे सांगत त्यांनी आपल्या अनेक मराठी आणि उर्दू गझला पेश केल्या.


महाराष्ट्रात सुरु झालेला मराठी आणि उर्दू गझलांचा हा एल्गार अधिक सशक्त करण्यासाठी हे दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अत्यंत प्रभावी आणि आशादायी ठरणार असून या संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबध्दल त्यांनी साधना सेवाभावी संस्थेचे सचिव दगडू लोमटे आणि त्यांच्या सर्व सहका-यांचे मनापासून कौतुक केले.


या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना राजेसाहेब देशमुख यांनी साधना सेवाभावी संस्थेचे वतीने अंबाजोगाई शहरात गझलांचा हा दोन दिवसीय दरबार अंबाजोगाईत घेतल्याबद्दल संयोजक दगडू लोमटे यांचे कौतुक करुन गझलेचे सामान्य माणसाच्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे अनेक उदाहरणे देत सांगितले. यापुढे गझलेल्या कोणत्याही कार्यक्रमाला आपण मनापासून सहकार्य करु असे सांगितले.
या संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करतांना संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी हे गझल संमेलन अतिशय देखणे, दृष्टलागण्याजागे झाले असे सांगत या संमेलनात आयोजित करण्यात आलेली १७ ही मुशायरे सत्रे ही अत्यंत दर्जेदार आणि प्रवाही झाली असल्याचे सांगितले.

या १७ ही मुशायरे सत्रांना दगडू लोमटे यांनी आपल्या कल्पकतेने महाराष्ट्रातील दिवंगत गझलकारांची नांवे दिली याबद्दल समाधान व्यक्त केले.


संमेलनाच्या उद्घाटनीय कार्यक्रम सत्रात आपण सविस्तर बोललो असल्यामुळे समारोपीय कार्यक्रमात आपण जास्त बोलणार नाहीत असं सांगत त्यांनी या संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबध्दल दगडू दादा लोमटे यांचे कौतुक केले.

१७ मुशायरांना उत्तम प्रतिसाद
या दोनदिवसीय गझल संमेलनात एकुण १७ मुशयरांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील दिवंगत मराठी आणि उर्दू गझलकारांच्या स्मृती जागवत त्यांची नावे या मुशायरांना देण्यात आली होती.
या १७ मुशायरांपैकी पहिल्या दिवशी सतीष दराडे, राम मुकद्दम, कमलाकर आबा देसले, मनोहर रणपीसे, अरुणोदय भाटकर, ग्वाही जमादार, अनिल कांबळे, मधुसूदन नानिवडेकर, आणि बशर नवाज तर संमेलनाच्या दुसरे दिवशी २ फेब्रुवारी रोजी प्रकाश मोरे, व्यंकटेश देशमुख, विनीता कुलकर्णी, नाना बेनगुडे, सुप्रिया जाधव, उ. रा. गिरी, लक्ष्मण जेवरे, गिरीश खारकर, बदिउज्जमा खावर यांच्या नावाने ही १७ मुशायरे आयोजित करण्यात आली होती. या १७ मुशायरामध्ये जवळपास २०० गझलकारांनी सहभाग घेत आपली गझल सादर केली.

मान्यवरांची सतत उपस्थिती

या गझल संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे, प्रमुख अतिथी ज्येष्ठ उर्दू मराठी गझलकार डॉ. संदीप गुप्ता, पुरस्कार मुर्ती गझलगंधर्व सुधाकर कदम यांच्या सह महाराष्ट्रातील मान्यवर गझलकारांनी या १७ ही मुशायरांना आपली उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.

तिसरे संमेलन अमरावती ला!

दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन समारोपापुर्वीच तिसरे संमेलन कोठे घ्यावे या बाबत संयोजन समितीने चर्चा केली. यावेळी संयोजन समितीकडे अमरावती, गोवा आणि बुलढाणा या तीन शहारातील गझलकारांनी आपल्या कडे प्रस्ताव सादर केला. यापैकी तिसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन घेण्याचा मान अमरावती लाख दिला असल्याचे संयोजक दगडू लोमटे यांनी जाहीर केले.

शहर गझलमय झाले!

अंबाजोगाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या आयोजनामुळे संपुर्ण शहर गझलमय झाल्यागत जाणवत होते. या संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या १७ गझल मुशायरांना अंबाजोगाई शहरातील गझल रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या समारोपीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवयत्री तिलोत्तमा पतकराव यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles